• Wed. Apr 30th, 2025

अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन

Byjantaadmin

Dec 15, 2022

मुंबई,  : राज्यामध्ये 18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, अशा सूचना अल्पसंख्याक विकास विभागामार्फत देण्यात आल्या आहेत. यानिमित्त विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संयुक्त राष्ट्र संघटनेने 18 डिसेंबर 1992 रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्काचा जाहीरनामा स्वीकृत केला आहे. त्यानुसार अल्पसंख्याक नागरिकांना त्यांची संस्कृती, भाषा, परंपरांचे संवर्धन करता यावे, तसेच याबाबतच्या वैशिष्ट्यांची प्रभावीपणे अभिव्यक्ती करता यावी यादृष्टीने प्रयत्न करण्याबाबत राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने सूचना दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यात हा दिन साजरा करावा, अल्पसंख्याक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्काची जाणीव आणि त्यांची माहिती देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशा सूचना अल्पसंख्याक विकास विभागामार्फत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग तसेच राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सर्व जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये अशासकीय समाजसेवी संस्थांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी गट व विद्यार्थ्यांसाठी भित्तीपत्र स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित करावी.  या कार्यक्रमातील विजेत्यांना पारितोषिके देण्यात यावी तसेच व्याख्यानमाला, चर्चासत्र, परिसंवाद या स्वरूपांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यात हा उपक्रम व्यापक प्रमाणात राबविण्यासाठी सर्व जिल्ह्यांना सूचना देणे, कार्यक्रमाची रूपरेषा  ठरविणे, कार्यक्रमांचे आयोजन, मार्गदर्शन करण्याची जबाबदारी अल्पसंख्याक आयोगाची राहील. तसेच जिल्ह्यात हा उपक्रम व्यापक प्रमाणात राबविण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांची राहील, असे कळविण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *