• Sat. May 10th, 2025

मोदी-शहांचा पाडाव झाला पाहिजे, मतविभागणी टाळा, कोणत्या जागा हव्यात ते सांगा, मविआशी बोलतो,’निर्भय बनो’चे वंचितला पत्र

Byjantaadmin

Mar 29, 2024

मुंबई : लोकशाहीसाठी मजबूत आघाडी करून एकत्रितपणे या निवडणुकीत मोदी-शहा प्रवृत्तीचा पाडाव झाला पाहिजे, असे सांगून वंचित बहुजन आघाडीचे राजकारण मोदी-शहा या लोकशाहीविरोधी प्रवृत्तीस उपयोगाचे ठरू नये अशीच प्रक्रिया ठरवावी, अशी अपेक्षा ‘निर्भय बनो’ या संघटनेने व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील नेमके कोणते मतदारसंघ हवे आहेत, याची यादी आम्हाला द्या, आम्ही इतर राजकीय पक्षांशी संवाद करण्यास तयार आहोत, असेही निर्भय बनो संघटनेने म्हटले आहे.महाविकास आघाडीशी फारकत घेत प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी सकाळी आपले नऊ उमेदवार जाहीर केले. मनोज जरांगे यांच्याशी समाजिक युती करणार असल्याचे सांगून वंचित आपली वेगळी चूल मांडणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. त्यांची ही भूमिका भाजपधार्जिणी असल्याची टीका समाज माध्यमांतून होऊ लागली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही आंबेडकरांनी भाजपला फायदा होईल, असे पाऊल उचलू नये, अशी विनंती केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यात मोदी सरकारविरोधात रोखठोकपणे सभा घेऊन परिवर्तनाची आस बाळगून असलेल्या ‘निर्भय बनो’ संघटनेने वंचित बहुजन आघाडीला राज्यातील जनतेच्या वतीने खुले पत्र लिहिले आहे. या पत्रातून वंचित बहुजन आघाडी आणि इतर विरोधी पक्ष यांच्यात संवाद वाढविण्यासाठी आणि मोदी-शहा-भाजप विरुद्धची मतविभागणी टाळण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यास तयार असल्याचे संघटनेने सांगितले आहे.

निर्भय बनो संघटनेचे वंचितला जनतेच्या वतीने खुले पत्र

वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून दूर असलेल्या अनेक घटकांना राजकीय प्रक्रियेत आणण्यात तुम्ही जो पुढाकार घेतलेला आहे त्याला मोठी लोकमान्यता मिळते आहे. तुमचे हे पाऊल भारतीय लोकशाही सशक्त होण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे.मागील काही वर्षात वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे आणि राज्याच्या राजकारणाला प्रभावित करण्याची क्षमताही त्यातून दिसून आली आहे. सध्या राजकीय घडामोडींना अतिशय वेग आला असून लोकशाही रक्षणासाठी व संविधानाचे पावित्र्य जपण्यासाठी अनेक महत्त्वाचे राजकीय पक्ष एकत्र येत आहेत. विरोधी पक्षांच्या या ऐक्यातून साहजिकच मोदी-शहा आणि भाजप यांचे सरकार नको ही भूमिका ठळक झाली आहे.या पार्श्वभूमीवर जनतेच्या अपेक्षाही वाढल्या आहेत आणि लोकांची अशी अपेक्षा आहे की लोकशाहीसाठी मजबूत आघाडी करून एकत्रितपणे या निवडणुकीत मोदी-शहा प्रवृत्तीचा पाडाव झाला पाहिजे. वंचित बहुजन आघाडीचे राजकारण मोदी-शहा या लोकशाहीविरोधी प्रवृत्तीस उपयोगाचे ठरू नये अशीच प्रक्रिया ठरवावी नाणि त्यात सहभागी व्हावे यासाठी राज्यातील सर्व महत्त्वाच्या राजकीय पक्षांशी वंचित बहुजन आघाडी चचदिखील करत आहे.जागावाटपावरून होणारी संभ्रमावस्था टाळण्यासाठी खूपच कमी कालावधी हातात असल्याने आम्ही ‘निर्भय बनो’तर्फे नागरिकांची भूमिका म्हणून आपल्याला हे पत्र लिहित आहोत. वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील नेमके कोणते मतदारसंघ हवे आहेत अशी स्पष्ट मागणी करणारे लेखी पत्र आपण तयार केल्यास त्यानुसार इतर राजकीय पक्षांशी संवाद करण्यास आम्ही तयार आहोत. वंचित बहुजन आघाडी आणि इतर विरोधी पक्ष यांच्यात संवाद वाढवण्यासाठी आणि मोदी-शहा-भाजप विरुद्धची मतविभागणी टाळण्यासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करण्यास तयार आहोत.कोणत्याही आघाडीतील पक्षांची आमचा कोणताही थेट संबंध नाही; परंतु लोकशाहीवादी भूमिकेतून अनायासे वाढलेले संबंध जर सकारात्मक, लोकशाहीपूर्ण राजकारण प्रस्थापित करण्यासाठी वापरता येत असतील तर तसा प्रयव करण्याची आमची इच्छा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *