चला जाणुया नदीला’ अभियान
मांजरा नदी प्रदूषणाची कारणे शोधण्यासाठी समिती ; लोकांमध्ये नदीच्या आरोग्यासाठी जाणीवजागृतीवर भर देणार
– जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.
▪️ लातूर जिल्ह्यातील चार उपनद्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार समिती
लातूर, दि. 15 (जिमाका) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘चला जाणुया नदीला’ अभियान जिल्ह्यात राबविण्यात येणार असून यासाठी मांजरा नदीची निवड करण्यात आली आहे. या नदीच्या प्रदूषणाची कारणे शोधण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून नदीच्या आरोग्याबाबत लोकांमध्ये जाणीवजागृती करण्यासाठीच्या सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत केल्या.
रोहयोचे उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी एच. व्ही. वडगावे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक एम. ए. जाजनूरकर, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी एम. जे. ढमाले, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त स. इ. नायकवडी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या लातूर उपकेंद्राचे डॉ. अनिल जायभाये, सहायक वनसंरक्षक वैशाली तांबे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी पी. व्ही. कांबळे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाच्या तंत्र अधिकारी श्वेता गिरी, मांजरा नदी जलसंवाद यात्रेचे संयोजक डॉ. संजय गवई, मानव लोक संस्थेचे काकासाहेब आगळे, डॉ. एच. ए. साळुंखे यावेळी उपस्थित होते.
‘चला जाणुया नदीला’ अभियानास जिल्ह्यात 8 जानेवारी रोजी प्रारंभ होणार असून या अनुषंगाने तांत्रिक समिती गठीत करण्यात येत आहे. या समितीने नदीच्या प्रदूषणाची कारणे शोधून त्याबाबतचा अहवाल तातडीने जिल्हास्तरीय समितीला सादर करणे आवश्यक आहे. या समितीत जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आदी कार्यालयांच्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. अभियान काळात नदी काठच्या गावांमध्ये विविध उपक्रम राबवून जाणीवजागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित सरपंच, ग्रामसेवक यांची बैठक घेवून आवश्यक सूचना द्याव्यात. तसेच जनजागृतीसाठी इतर उपक्रमांच्या आयोजनासाठी गठीत समितीने आपले नियोजन तातडीने सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिल्या.
जिल्ह्यातील मांजरा नदीचा समावेश शासन निर्णयाद्वारे ‘चला जाणुया नदीला’ अभियानात करण्यात आला असून या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. याच धर्तीवर जिल्ह्यातील लेंडी, मन्याड, तावरजा आणि तेरणा नदीसाठी अभियान राबविण्यात येणार असून यासाठी संबधित उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी बी. पी. यांनी यावेळी दिल्या.
*रोहयो उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती*
‘चला जाणुया नदीला’ अभियानाला जिल्ह्यात 8 जानेवारीपासून सुरुवात होत असून तत्पूर्वी नदी प्रदूषणाची कारणे शोधण्यासाठी तांत्रिक समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रोहयोचे उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत वरिष्ठ भूवैज्ञानिक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्यासह इतर विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश राहील.
जलसंवाद यात्रा 8 जानेवारीला लातूर जिल्ह्यात
‘चला जाणुया नदीला’ अभियानांतर्गत आयोजित मांजरा नदीच्या जलसंवाद यात्रेला 1 जानेवारी 2023 पासून बीड जिल्ह्यातून सुरुवात होणार आहे. 8 जानेवारी रोजी ही यात्रा लातूर जिल्ह्यात पोहोचणार आहे. या अनुषंगाने झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी आतापर्यंत करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला. तसेच अभियानाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या अनुषंगाने आवश्यक सूचना दिल्या.