latur लोकसभा निवडणुकीसाठी लातूरमधून महाविकास आघाडीने डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर काँग्रेस आमदार माजी मंत्री अमित देशमुखग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी काळगेंच्या प्रचाराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. त्यासाठी विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठीही ते प्रयत्न करत आहेत. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसने नांदेड लोकसभेसाठी नव्या चेहऱ्याचा शोध सुरू केला होता. तेव्हा लोहा-कंधार विधानसभेचे शेकापचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी आशाताई शिंदे यांना काँग्रेसने पक्ष प्रवेशाची ऑफर दिली होती. परंतु पक्ष प्रवेशास नकार देणाऱ्या शिंदे यांनी आज लातुरात अमित देशमुख यांची भेट घेत काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दर्शविला आहे.

आमदार श्यामसुंदर शिंदे, आशाताई शिंदे यांनी या भेटीत लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या शिवाजी काळगे यांना मताधिक्य मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याचेही अमित देशमुख यांनी सांगितले. महाविकास आघाडीने लातूर मतदारसंघात भाजपची हॅटट्र्रिक रोखण्यासाठी तयारी सुरू केली आहे. 2014 आणि त्यानंतर झालेल्या 2019 अशा सलग दोन निवडणुकीत काँग्रेसला लातूरमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता.
दरम्यान, जिल्ह्यातील काँग्रेसचीसगळी सूत्रं ज्या देशमुखांच्या हाती आहेत, त्यांच्यावरच सेटलमेंटच्या राजकारणाचा आरोप झाला होता. लातूर शहर आणि लातूर ग्रामीण हे अनुक्रमे अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांचे मतदारसंघ सेफ राहावे, यासाठी देशमुख बंधू लोकसभेला सेटलमेंट करतात, अशा आरोप त्यांच्यावर विरोधकांकडून केला जातो. परंतु राज्यातील बदलते राजकीय समीकरण पाहता काँग्रेसने लातूर मतदारसंघाची जागा खेचून आणायचीच असा निर्धार केला आहे.काँग्रेसच्या लातुरात झालेल्या मराठवाडा विभागीय बैठकीतही राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी लोकसभेची जबादारी देशमुख बंधूंनी स्वीकारावी, राज्यभरात फिरावे, असे आवाहन केले होते. कुठल्याही परिस्थितीत लातूरची जागा जिंकायचीच म्हणून देशमुखांनी शिफारस केलेल्या काळगे यांनाच पक्षाने उमेदवारीही दिली. त्यामुळे आता त्यांना निवडून आणण्याची जबाबदारीही देशमुखांना स्वीकारावी लागणार आहे. त्यामुळेच अमित देशमुख यांनी शेकापचा पाठिंबा मिळावा यासाठी प्रयत्न केले होते.अखेर देशमुखांच्या प्रयत्नाला यश आले असून, आज शेतकरी कामगार पक्षाचे लोहा-कंधारचे आमदार श्यामसुंदर शिंदे तसेच त्यांच्या पत्नी शेकाप महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा आशाताई शिंदे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील यांची आज बाभळगाव निवासस्थानी अमित देशमुख यांची भेट घेतली. काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना विजयी करण्याच्या दृष्टीने लोहा- कंधार विधानसभा मतदारसंघातून या वेळी चांगले मताधिक्य मिळवून दिले जाईल, अशी ग्वाही शामसुंदर शिंदे यांनी दिल्याचे देशमुख यांनी सांगितले.