माढ्याच्या उमेदवारीवरून महायुतीत सुरू झालेला वाद अद्याप शमण्याची चिन्हं नाहीत. मोहिते पाटलांच्या नंतर आता राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही रणजितसिंह निंबाळकरांना उघड विरोध केला आहे. रणजितसिंह निंबाळकरांची प्रचार करण्याची आमची मानसिकता नाही, उमेदवार बदला अशी मागणी करत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट अजित पवारांनाच साकडं घातलं आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मागणी काय?
माढा लोकसभेत भाजपने रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी जाहीर केली आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकाही कार्यकर्त्यांची त्यांचा प्रचार करण्याची इच्छा नाही. आम्ही बरं बोलण्यापेक्षा खरं बोलण्यासाठी, अजितदादा तुमच्यासमोर आलोय. भाजपचा आणि उमेदवाराचा सगळा एक कलमी कार्यक्रम आहे. त्यामुळं तुम्ही भाजपचा उमेदवार बद्दलण्याबाबत विचार करावा. भाजपच्या वरिष्ठांना हे कळवावे. निंबाळकर सोडून कोणताही उमेदवार द्या, आम्ही जोमाने काम करू आणि त्यांना खासदार बनवू.