• Thu. May 15th, 2025

सकाळी ११पर्यंत ‘आपलं’ मतदान उरका! मंदिरात बैठका, ३६ संघटना सक्रिय; भाजपसाठी कोण ताकद लावतंय?

Byjantaadmin

Mar 26, 2024

मुंबई: देशात पुन्हा मोदी सरकार येणार की इंडिया आघाडी भाजपचा झंझावात रोखण्यात यशस्वी होणार याचं उत्तर ४ जूनला मिळेल. लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेत कायम ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं हालचाली सुरू केल्या आहेत. संघ आणि संघ परिवारातील तब्बल ३६ संघटना भाजपसाठी कामाला लागल्या आहेत.’आपले’ मतदार सकाळी ११ पर्यंत मतदान पूर्ण करतील या दृष्टीनं प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी यंत्रणा सक्रिय करा, असे आदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि परिवारातील ३६ संघटनांच्या बैठकांमधून देण्यात आले आहेत. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात एकाच दिवशी प्रत्येक जिल्ह्याच्या बैठका झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यानंतर तालुकास्तरीय बैठका घेण्यात आल्या. जिल्हा बैठकांना संघाच्या त्या त्या ठिकाणचे जिल्हा संघचालक हजर होते. परिवारातील संघटनांचे प्रमुख पदाधिकारी आणि भाजपचे निवडक नेतेही बैठकांना उपस्थित होते. आपल्या परंपरागत उमेदवारांचं मतदान सकाळी ११ पर्यंत आटोपलं पाहिजे, अशा सूचना बैठकांमध्ये देण्यात आल्या.मतदानाच्या दिवशी परिवारातील सर्व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, परस्पर समन्वय राखतील. केंद्रात पुन्हा एकदा राष्ट्रीय विचारांचे सरकार सत्तेत आणण्यासाठी झोकून देऊन काम करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. मोदी सरकारनं गेल्या १० वर्षांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातला. महत्त्वाचे विषय निकाली लावले. असेच काही विषय धसास लावायचे असल्यास आपल्या विचारांचं सरकार येणं गरजेचं असल्याचं बैठकीत सांगण्यात आलं.

गावागावातील मंदिरांमध्ये बैठका होणार
राष्ट्रीय मुद्द्यांचा अजेंडा राबवायचा असल्यास पुन्हा एकदा मोदींना संधी द्या, असा संदेश देणाऱ्या हजारो बैठका घेण्यात येतील. यासाठी संघ आणि संघ परिवाराच्या ३६ संघटनांचे पदाधिकारी येत्या १५ ते २० दिवसांत राज्यभर बैठका घेतील. विशेष म्हणजे शक्यतो गावागावातील मंदिरांमध्ये बैठकांचं आयोजन करण्यात येईल. प्रत्येक बैठकीला १० ते १२ जणांनाच आमंत्रित केलं जाईल. विविध क्षेत्रात प्रभाव असणाऱ्या व्यक्तींचा आमंत्रितांमध्ये समावेश असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *