सरकारनं मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले असले, तरी समाजात नाराजी आणि संताप कायम दिसत आहे. याचा प्रत्यय वारंवार येत असून भाजपच्या राष्ट्रीय सचिव व लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा ताफा जात असताना त्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. हा प्रकार बीड तालुक्यातील साक्षाळपिंपरी येथे शनिवारी ( 23 मार्च ) घडला. याप्रकरणी बीड ग्रामीण ठाण्यात आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.बीड लोकसभा निवडणुकीचीउमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे जिल्ह्यात आल्या. त्यांनी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्यासह विविध ठिकाणी गाठी-भेटी आणि धार्मिक स्थळांचे दर्शन सुरु केले आहे. त्या नारायणगाडवर दर्शनासाठी गेल्या. परत बीडला येताना साक्षाळपिंपरी येथील मराठा आंदोलकानी त्यांच्या गाडीला काळे झेंडे दाखविले. पोलिसांनी त्यांना बाजूला केले.यावेळी ‘एक मराठा, लाख मराठा’, अशा घोषणाही आंदोलकांनी दिल्या. आंदोलक आक्रमक झालेले पाहून त्यांचा ताफा सरळ बीडला निघून गेला. त्यानंतर पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघण, आचारसंहिता असतानाही विनापरवानगी आंदोलन केल्याने पोलिसांच्या फिर्यादीवरून भरत बबन काशीद, शशिकांत परसराम काशीद, श्रीराम बंडू काशीद, अक्षय अजिनाथ काशीद, ज्ञानेश्वर हौसराव काशीद यांच्यासह अनोळखी 8 ते 10 मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल केला.दरम्यान, जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनाच्या अनुषंगाने गुन्ह्यांचे सत्र सुरूच आहे. जमावबंदीचे निमित्त करून गुन्हे नोंद केले जात असल्यानं समाजातून संताप व्यक्त होत आहे
