• Wed. May 14th, 2025

जाहिरात प्रमाणीकरणासह सोशल मिडीयाच्या वापरावर लक्ष ठेवा –  जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

Byjantaadmin

Mar 21, 2024

जाहिरात प्रमाणीकरणासह सोशल मिडीयाच्या वापरावर लक्ष ठेवा –  जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

·         जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीची सभा

·       इलेक्ट्रॉनिक माध्यमातील जाहिरातींचे पूर्व-प्रमाणीकरण बंधनकारक

लातूर, : भारत निवडणुक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून त्या अनुषंगाने जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समिती (एमसीएमसी) कार्यान्वित करण्यात आली आहे. या समितीने इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसारित होणाऱ्या जाहिरातींच्या पूर्वप्रमाणीकरणासह सोशल मिडीयाच्या वापरावरही लक्ष ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात एमसीएमसी समितीच्या बैठकीत श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, प्र. अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, समितीच्या सदस्य उपविभागीय अधिकारी अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, पोलीस उपाधिक्षक जी. एल. भातलवंडे, सायबर सेलचे पोलीस निरीक्षक दयानंद पाटील, बीएसएनएलचे उपविभागीय अधिकारी विजयकुमार पाटील, पुरणमल लाहोटी शासकीय तंत्र निकेतनचे व्याख्याता एस. डी. जाधव, धनंजय पवार, विनोद चव्हाण यांची यावेळी उपस्थिती होती.

निवडणूक काळात माध्यम प्रमाणीकरण आणि माध्यम सनियंत्रण समितीची भूमिका अत्यंत महत्वाची असून सोशल माध्यमांद्वारे होणाऱ्या प्रचारावरही या समितीने काळजीपूर्वक लक्ष ठेवावे. तसेच या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार आणि अनुषंगिक अधिनियमानुसार कार्यवाही करावी. पेडन्यूज, जाहिरात खर्च याविषयी काटेकोरपणे कार्यवाही करून त्याबाबतचा अहवाल सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दिल्या.

समितीचे सदस्य सचिव तथा प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप यांनी समितीची रचना, कार्य आणि जबाबदाऱ्या याविषयी सादरीकरण केले.

या जाहिरातींचे पूर्व-प्रमाणीकरण आवश्यक

दूरचित्रवाणी वाहिनी, केबल नेटवर्क, केबल वृत्तवाहिन्या, सिनेमा हॉल, रेडिओ, सार्वजनिक तसेच खासगी एफएम चॅनेल्स, सार्वजनिक ठिकाणी दाखविण्याच्या दृक-श्राव्य जाहिराती, ई-वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती, बल्क एसएमएस, रेकॉर्ड केलेले व्हाईस मेसेजेस, सोशल मीडिया, इंटरनेट संकेतस्थळे यावर दर्शविण्याच्या जाहिराती तसेच मतदानाच्या आणि त्याच्या एक दिवस आधी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या जाहिरातींचे  पूर्व-प्रमाणीकरण एमसीएमसी समितीकडून करून घेणे बंधनकारक आहे. खासगी व्यक्ती, उमेदवार यांच्या जाहिरातींचे प्रमाणीकरण जिल्हास्तरीय एमसीएमसी समितीकडून करण्यात येते, तसेच राजकीय पक्ष, संघटना, समूह यांच्या जाहिरातींचे प्रमाणीकरण राज्यस्तरीय समितीमार्फत केले जाते. जाहिरात प्रसारित अथवा प्रसिद्ध करण्याच्या नियोजित दिवसाच्या तीन दिवस अगोदर जिल्हास्तरीय समितीकडे पूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज, जाहिरातीची अर्जदाराने स्वाक्षरीत केलेली दोन प्रतीतील मुद्रित स्क्रिप्ट, जाहिरातीच्या दोन सीडी समितीकडे सादर करणे बंधनकारक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *