• Tue. May 13th, 2025

अमरावतीची जागा शिंदे गटाला नाहीच, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान

Byjantaadmin

Mar 20, 2024

AMRAVATI LOKSABHA निवडणुकीवरून शिंदे गट आणि अपक्ष आमदार नवनीत राणा यांच्यातील रस्सीखेच सुरू असतानाच मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघाबाबतचं मोठं विधान केलं आहे. त्यामुळे शिंदे गटाची मोठी गोची झाली आहे. फडणवीस यांनी अमरावतीची जागा भाजपच लढणार असल्याचं थेट स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शिंदे गटाने महायुतीत ही जागा गमावल्याचं स्पष्ट झालं आहे. भाजप ही जागा लढणार असल्याने आता आनंदराव अडसूळ काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर, नवनीत राणा यांचं काय होणार? याची उत्सुकताही ताणली गेली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोल्यात आले होते. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही मोठी माहिती दिली. अमरावती लोकसभेची जागा भाजप लढेल. जो उमेदवार असेल तो भाजपच्या चिन्हावर लढेल. नवनीत राणा तिथल्या विद्यमान खासदार आहे. नवनीत राणा पूर्ण पाच वर्ष भाजप सोबत राहिल्या आहेत. पाच वर्षे त्यांनी लोकसभेमध्ये अतिशय ताकदीने भाजप आणि मोदींची बाजू मांडली आहे. शेवटी अंतिम निर्णय आमचं पार्लमेंट्री बोर्ड आणि निवडणूक कमिटी घेईल. त्याबद्दल यापेक्षा अधिक काहीही सांगू शकत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. फडणवीस यांच्या या विधानामुळे अमरावतीची जागा शिंदे गटाकडे राहणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आनंदराव अडसूळ काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर, नवनीत राणा यांना भाजपमध्ये प्रवेश केला तरच तिकीट मिळू शकतं, असं फडणवीस यांच्या विधानातून अधोरेखित झाल्याने नवनीत राणाही काय राजकीय निर्णय घेतात याकडेही सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे.

शिवसेनेला काम करायचं आहे

यावेळी त्यांना आनंदराव अडसूळ यांच्याबाबत विचारण्यात आलं. त्यावरही त्यांनी ठाम प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ज्या ठिकाणी भाजपला जागा सुटेल, त्या ठिकाणी शिवसेनेने काम करायचं आहे. जिथे शिवसेनेला जागा सुटेल, तिथे आम्ही त्यांचे काम करायचं आहे. जिथे राष्ट्रवादीला सुटेल तिथे आम्ही दोघांनी काम करायचं आहे, असं सांगत फडणवीस यांनी आडसूळ यांच्या राजकीय भवितव्यावर बोलणं टाळलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *