• Wed. May 7th, 2025

अमेरिकन तपास यंत्रणांच्या रडारवर अदानी समूह; कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण, काय आहे प्रकरण?

Byjantaadmin

Mar 18, 2024

हिंडेनबर्ग अहवालाचा फटका बसलेल्या गौतम अदानी यांच्या समोर आणखी एक नवी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळत आहे. खरे तर अमेरिकेतील सरकारी वकिलांनी अदानी समूहाबाबत तपासाची व्याप्ती वाढवली असून, त्याचा परिणाम समूहाच्या शेअर्सवर होताना दिसत आहे.देशांतर्गत शेअर बाजारातील चढउतारांदरम्यान आज गौतम अदानी समूहाच्या बहुतांश कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. अदानी टोटल गॅस शेअर्स 3.30 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होते तर NDTV शेअर्स सुमारे एक टक्क्यांनी घसरून 217 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते.

अदानी समूहाचे शेअर्स घसरण्याचे कारण काय?

ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, अमेरिका अदानी समूहाचे संस्थापक गौतम अदानी आणि त्यांच्या कंपन्यांची लाचखोरीत सहभागी असल्याच्या संशयावरून चौकशी करत आहे.ऊर्जा प्रकल्पासाठी अधिकाऱ्यांना लाच देण्यात अदानी ग्रुप किंवा गौतम अदानी यांच्यासह कंपनीशी संबंधित लोकांचा सहभाग होता का, याचा तपास सुरु आहे. यूएस कायद्यानुसार, तपार यंत्रणा परदेशी भ्रष्टाचाराच्या आरोपांचा पाठपुरावा करू शकतात.

अदानी समूहाच्या शेअर्सची स्थिती

समूहाची मुख्य कंपनी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचे share आज दुपारी 1:30 वाजता 1.12 टक्क्यांनी घसरून 3,097.00 रुपयांवर व्यवहार करत होते. याशिवाय अदानी पॉवर 1.03 टक्के, अदानी टोटल गॅस 3.34 टक्के, अदानी ग्रीन एनर्जी 1.74 टक्के, अदानी पोर्ट्स 1.57 टक्के, अदानी विल्मार 1.73 टक्के आणि अदानी एनर्जी सोल्युशन्स 2.99 टक्क्यांनी घसरले.

काय आहे प्रकरण?

अहवालानुसार, अदानी समूहाची कंपनी किंवा गौतम अदानीसह कंपनीशी संबंधित इतर लोक भारतात ऊर्जा प्रकल्प मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना लाच देण्यात गुंतले होते का, याचा तपास यंत्रणा करत आहेत.अदानी समूहाने एका निवेदनात म्हटले आहे की, “आम्हाला आमच्या चेअरमनविरुद्ध कोणत्याही चौकशीची माहिती नाही.” निवेदनात पुढे म्हटले आहे, “एक व्यावसायिक समूह म्हणून, आम्ही कॉर्पोरेट प्रशासनाच्या मानकांनुसार कार्य करतो. आम्ही भारत आणि इतर देशांमधील भ्रष्टाचार विरोधी आणि लाच विरोधी कायद्यांचे पूर्ण पालन करतो.”

नोंद – क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *