मराठा आरक्षणाच्या मागणीवरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते, लोकप्रतिनिधी यांना गावबंदी करण्याच्या आवहनाची पडसाद उमटताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजामध्ये राजकीय नेत्यांबद्दलचा रोष कुठल्या ना कुठल्या प्रकारे व्यक्त होत आहे. नांदेड उत्तरचे शिवसेना (शिंदे गट) आमदार बालाजी कल्याणकर यांनाही अशाच रोषाला सामोरे जावे लागले. अर्धापूर येथे एका विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या कल्याणकर यांच्या उभ्या असलेल्या कारवर अज्ञातांनी दगड घालत ती फोडण्याचा प्रयत्न केला. रविवारी (ता. 17) अर्धापूर तालुक्यातील एका विवाह सोहळ्यात वधु-वराला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आमदार कल्याणकर हे आपल्या समर्थकांसह कारने आले होते. याची माहिती मिळताच अज्ञातांनी कारच्या काचा फोडत एक मराठा लाख मराठा, समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा दिल्या.ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानूसार राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसेच आमच्या घरी पुढाऱ्यांनी येऊ नये ,असे पोस्टर दारावर लावण्यात येत आहेत. जरांगे पाटील यांच्या मराठवाड्यासह राज्यभरातील संवाद सभांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. जरांगे पाटील यांच्या आवहनानंतर लोकप्रतिनिधींना गाव बंदी केली जात आहे.आधी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजपाचे परतूरचे आमदार बबनराव लोणीकर यांना मराठा समाजच्या तरुणांनी गावातून हुसकावून लागवे होते. त्यानंतर आज अर्धापूर तालुक्यात आमदार बालाजी कल्याणकर यांच्या कारच्या काचा फोडत त्यांना विरोध करण्यात आला. कल्याणकर हे अर्धापूर तालुक्यातील देगाव कुराडा येथे विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आले होते. ते विवाह सोहळ्यासाठी टाकलेल्या मंडपात बसले होते.कार मंडपापासून काही अंतरावर उभी करण्यात आली होती. कारचालक गाडी जवळ नसतांना अज्ञातांनी मागच्या बाजूने गाडीवर दगड घालत ती फोडली. या घटनेनंतर उपविभागीय अधिकारी डेनियल बेन, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
