खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव भाजपच्या लोकसभेच्या उमेदवारांच्या यादीत नसल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांचा भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यावरच आक्षेप असून, कदम यांनीच विरोधात वातावरण केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 50 ते 60 पदाधिकाऱ्यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची तयारी केली आहे.भारतीय जनता पक्षाने लोकसभा उमेदवारीच्या दोन याद्या प्रसिद्ध केल्या. या दोन्ही यादीत खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाचा समावेश झालेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याने त्यांचा मान राखून भाजपने पहिल्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश करावा, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांची होती. पण तसे झाले नाही. त्यातच भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यावर उदयनराजे समर्थकांचा आक्षेप आहे. त्यांनीच उमेदवारी देऊ नये, असा प्रचार काही मतदारसंघातील कार्यक्रमांत केल्याचे सांगितले जात आहे.काल सातारा शासकीय विश्रामगृह येथे काही मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक व कार्यकर्ते यांची बैठक सुरू होती. या बैठकीवेळी खासदार उदयनराजे समर्थक व भाजपचे जिल्हाध्यक्ष समोरासमोर आले. ‘तुम्ही महाराजांच्या विरोधात का भूमिका मांडत असल्याचा जाब कदम यांना या वेळी विचारण्यात आला. त्यावरून वादाची ठिणगी पडली. उदयनराजे यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी धैर्यशील कदम यांना घेरून जाब विचारला.सध्या महायुतीच्या यादीत सातारा लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी द्यावी, अशी सर्वांची आग्रही मागणी आहे. त्यामुळे भाजपच्या जिल्हाध्यक्ष कदम हेच विरोधात काम करत असल्याचा कारणाने उदयनराजे समर्थक आक्रमक आहेत. साधारण 50 ते 60 कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनाम्याची तयारी केली आहे. आजच्या दिवसातील घडामोडीकडे सर्वच जण लक्ष ठेऊन आहेत.दरम्यान, आज खासदार उदयनराजे भोसले स्वतः काहीतरी भूमिका मांडून कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम कोणती भूमिका घेणार याची उत्सुकता आहे.
