• Sat. May 3rd, 2025

सत्ताधाऱ्यांना अनुकूल चित्रपटांची निवडणुकीत लाट!

Byjantaadmin

Mar 14, 2024

सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections 2024) वारे वाहू लागले आहेत. यंदाच्या निवडणुकीत सत्ता कायम ठेवण्याचा चंग सत्ताधारी भाजप-एनडीएने (BJP NDA) केला आहे. तर, दुसरीकडे भाजपला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्धार विरोधक इंडिया आघाडीने केला आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून टीकेला धार आली आहे. अशातच दुसरीकडे  बॉक्स ऑफिसवरही राजकीय वातावरण तापणार आहे.

सत्ताधारी भाजपला अनुकूल असलेले काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले आहेत. ‘आर्टिकल 370’ या चित्रपटाचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेतही केले होते. त्यानंतर आता ऐन निवडणुकीच्या दरम्यान काही चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. या चित्रपटांतून थेट राजकीय भाष्य करण्यात आले आहे. त्यामुळे या चित्रपटांच्या टायमिंगवर आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. 

काही दिवसांपूर्वी आर्टिकल 370 हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात दहशतवादी कारवाया, संविधानाने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्यासाठी केंद्र् सरकारने उचललेली पावले आदी मुद्यांचा परामर्श करण्यात आला होता. जम्मूतील सभेत पंतप्रधान मोदी यांनी हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले होते. 

कोणत्या चित्रपटात असणार राजकीय भाष्य?

बस्तर: द नक्षल स्टोरी Bastar The Naxal Story

‘द केरला स्टोरी’ या चित्रपटानंतर निर्माते विपुल शाह आणि अभिनेत्री अदा शर्मा यांचा बस्तर: द नक्षल स्टोरी  हा चित्रपट 15 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. बस्तरमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 76 जवान शहीद झाले होते. या घटनेची पार्श्वभूमी घेत चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाचा टीझरही वादात सापडला होता. यामध्ये उदारमतवादी, डाव्या विचारांच्या लोकांना संपवण्याची भाषा करण्यात आली होती. ट्रेलरमध्ये नक्षलवाद्यांचा हिंसाचार अधोरेखित करण्यात आला आहे. 

स्वातंत्र्यवीर सावरकर   Swatantra Veer Savarkar

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट 22 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. या  चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना दाखवण्यात आल्या. सावरकर विरुद्ध गांधी असा वादही दाखवण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्ववादी विचार या चित्रपटातून दिसण्याची शक्यता आहे. 

जेएनयू JNU 

एक विद्यापीठ देश तोडू शकते का असा सवाल करत जेएनयू चित्रपटाचे पोस्टर (JNU Film Poster Released) लाँच करण्यात आले आहे. या चित्रपटातील जेएनयू हे जहांगीरदार नॅशनल युनिर्व्हसिटी असे आहे.शिक्षणासोबत विविध राजकीय, सामाजिक मुद्यांवर भाष्य ते  विद्यार्थ्यांची चळवळ यासाठी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ प्रसिद्ध आहे. मात्र, मागील 10 वर्षांपासून जेएनयूमध्ये देशविरोधी कारवाया सुरू असल्याचा आरोप सातत्याने उजव्या विचारांचे पक्ष, संघटनांकडून करण्यात आला. जेएनयू या चित्रपटातही  याचे प्रतिबिंब असल्याची चर्चा सुरू आहे. हा चित्रपट 5 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. 

द साबरमती रिपोर्ट The Sabarmati Report

‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटाची कथा  ही गुजरात राज्यातील गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ 27 फेब्रुवारी 2002 रोजी सकाळी साबरमती एक्सप्रेस जाळण्यात आली होती.  या घटनेचे गुजरात आणि देशाच्या राजकारणावर दूरगामी  परिणाम झाले. चित्रपटाच्या टीझरमध्ये  विक्रांत न्यूज अँकरच्या अर्थात वृत्तनिवेदकाच्या भूमिकेत दिसत आहे. यावेळी रेकोर्डिंग करत असल्याचे दृष्य आहे. त्याच्या टेलिप्रॉम्पटरवर ‘गोध्रा अपघातामध्ये.. ‘अशी ओळ येते. त्याला तोडत वृत्तनिवेदकाच्या भूमिकेत असलेला विक्रांत मेस्सी हा गोध्रा येथील घटना अपघात नव्हती असे म्हणताना दिसत आहे. हा चित्रपट 3 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. 

रझाकार Razakar: The Silent Genocide of Hyderabad

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर  हैदराबाद संस्थानाने स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. तर, दुसरीकडे  संस्थानातील जनतेने भारतात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. रझाकार या चित्रपटात निजामाच्या फौजांनी धर्माच्या आधारे केलेला अत्याचार आणि भारत सरकारने राबवलेले ऑपरेशन पोलो यावर या चित्रपटाची कथा बेतली आहे. 

ग्रोधा Accident Or Conspiracy GODHRA 

गुजरातमधील गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ साबरमती एक्स्प्रेस जळीत कांड घडले. यामध्ये 59 कारसेवकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गुजरातमध्ये जातीय दंगली उसळल्या होत्या. या घटनेवर आधारीत हा चित्रपट मार्च महिन्यात प्रदर्शित होणार होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *