प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतीय रेल्वेच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ
रेल्वेला आधुनिक बनवून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
रेल्वेच्या एकता मॉल प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन
-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
· लातूर येथील मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याचे लोकार्पण
लातूर, दि. 12 : नवनवीन योजनांच्या माध्यमातून देशातील सर्वसामान्यांचा सातत्याने विकास होत असून आपण विकसित भारताच्या दिशेने अग्रेसर होत आहोत. आज 85 हजार कोटींहून अधिकचे प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होत असून रेल्वेला आधुनिक बनवून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.
प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे अहमदाबाद-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसच्या शुभारंभासह रेल्वेच्या विविध उपक्रमांची पायाभरणी आणि राष्ट्राला लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मुंबई सेंट्रल स्थानकावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते. लातूर येथील मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याचेही यावेळी लोकार्पण झाले.
प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले, 2024 या वर्षात सुमारे 11 लाख कोटींहून अधिक योजनांचे भूमिपूजन अथवा उद्घाटन झाले असून विकासाची ही गती कमी होऊ दिली जाणार नाही. मागील काही वर्षात रेल्वे अपघातांचे प्रमाण कमी झाले असून विजेवर चालणाऱ्या रेल्वेंची संख्या वाढली आहे. वंदे भारत एक्सप्रेसची संख्या वाढून विस्तार देखील होत आहे. रेल्वे स्थानकांचा कायापालट होत आहे. भारतातील सेमी हायस्पीड रेल्वेची मागणी इतर देशात वाढून भारतातील रेल्वेच्या कारखान्यांना अधिक काम मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकता मॉलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार असून तरुणांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, जीवनवाहिनी ठरलेल्या रेल्वेच्या देशभर पसरलेल्या जाळ्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात जगातील सर्वात मोठा ऐतिहासिक बदल होत आहे. देशात दररोज 15 कि.मी.चे नवीन रेल्वे ट्रॅक तयार होत आहेत. रेल्वे गाडी प्रमाणेच देशाच्या विकासाची गाडी वेगाने धावत आहे. वन स्टेशन वन प्रॉडक्ट योजना आणि एकता मॉलच्या माध्यमातून स्थानिक कारागिरांच्या उत्पादनांना प्रोत्साहन मिळत आहे. लातूर येथील कारखान्यात तयार होत असलेल्या वंदे भारत ट्रेनची राज्यातील संख्या सात वर पोहोचली असून राज्याच्या विकासात केंद्र सरकारचे मोठे साहाय्य मिळत असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. स्थानिकांना लाभ होणाऱ्या विविध योजना सुरू केल्याबद्दल त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
केंद्रीय मंत्री श्री.राणे यांनी जगाच्या प्रगतीत भारताचा मोठा वाटा असल्याचे सांगून 2047 पर्यंत भारत विकसित राष्ट्र होईल, असा विश्वास व्यक्त केला.
मंत्री श्री. लोढा यांनी राज्यपाल श्री.बैस आणि मुख्यमंत्री श्री.शिंदे हे दोघेही सर्वसामान्यांच्या विकासाचा विचार करणारे कॉमन मॅन असल्याचा उल्लेख केला. रेल्वे ही सर्वसामान्यांसाठी अतिशय उपयुक्त सिद्ध होत असून रेल्वेमार्फत सुरू होत असलेल्या विविध उपक्रमांचा मुंबई आणि महाराष्ट्राला लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एकता मॉल विषयी
केंद्र सरकारने प्रत्येक राज्यात एकता मॉल स्थापन करण्याची योजना जाहीर केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात नवी मुंबईतील उलवे येथे एकता मॉल उभारण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राष्ट्रीय एकात्मता, ‘मेक इन इंडिया’, जिल्हा एक उत्पादन (ओडीओपी) संकल्पनेला चालना देण्यासाठी तसेच ग्रामीण कारागिरांना त्यांची उत्पादने विकण्यास मदत करण्यासाठी हा मॉल उपयुक्त ठरणार आहे. सिडकोला यासाठी अंमलबजावणी एजन्सी म्हणून नेमण्यात आले. नियोजन विभागाने उलवे सेक्टर मधील प्लॉट क्रमांक पाच येथे एकता मॉलसाठी भूखंड निश्चित केला आहे हा भूखंड 5200 चौरस मीटर एवढा आहे. देशभरातील 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची संस्कृती देशभरातील 36 जिल्ह्यांमध्ये मॉलच्या माध्यमातून प्रदर्शित केली जाणार आहे. अठरा महिन्यात या मॉलचे बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे.
आज भूमिपूजन आणि लोकार्पण झालेल्या प्रकल्पांमध्ये राज्यातील एकूण 506 प्रकल्पांचा समावेश आहे. यामध्ये 150 वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्टॉल्स, 170 इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टम, 130 सौर पॅनेल, 18 नवीन रेल्वेमार्ग/ रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण/ गेज रुपांतरण, 12 गुड्स शेड, सात स्वयंचलित सिग्नलिंग प्रणाली, चार गती शक्ती कार्गो टर्मिनल, तीन विद्युतीकरण प्रकल्प, लातूर येथे कोच कारखान्याचे लोकार्पण, बडनेरा येथे वॅगन दुरूस्ती कार्यशाळा, पुणे येथील वंदे भारत चेअर कार मेंटेनन्स कम वर्कशॉप डेपो, पाच जनऔषधी केंद्रांचे उद्घाटन, चार रेल कोच रेस्टॉरंटचे उद्घाटन आदींचा समावेश असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
प्रास्ताविकाद्वारे विभागीय रेल्वे व्यवस्थापक निरज वर्मा यांनी अहमदाबाद-मुंबई मार्गावर सुरू होत असलेली वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस चालणार असल्याची माहिती दिली.
लातूर येथे मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याचे लोकार्पण
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याचे लोकार्पण झाले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची दूरदृष्य प्रणालीद्वारे, तर लातूर येथील मराठवाडा रेल्वे कोच कारखानास्थळी आयोजित कार्यक्रमाला खासदार सुधाकर शृंगारे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, सहायक जिल्हाधिकार नमन गोयल, रेल्वेचे मुख्य कारखाना अभियंता सुबोधकुमार सागर, माजी आमदार सुधाकर भालेराव, देविदास काळे, दिलीपराव देशमुख, गणेश हाके, सोलापूर रेल्वे विभागाचे सहायक व्यवस्थापक शैलेंद्रसिंह परिहार यांची उपस्थिती होती.
मराठवाडा रेल्वे कोच कारखान्यामुळे लातूरच्या विकासात भर पडणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात विविध विकास कामे सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून लातूर येथे मराठवाडा रेल्वे कोच कारखाना उभारण्यात आला. या कारखान्याच्या माध्यमातून प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष स्वरुपात रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच कारखान्यासाठी आवश्यक छोटे-छोटे उद्योगही येथे उभे राहतील, असे खासदार सुधाकर शृंगारे यांनी सांगितले.
मराठवाड्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी रेल्वे कोच कारखाना लातूर येथे उभारण्याची मागणी मांडण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, तत्कालीन रेल्वे मंत्री पियुष गोयल, तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मंजूर केली. कारखान्याच्या उभारणीसाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी यांचेही सहकार्य लाभले. लातूर येथे सुरु होत असलेल्या या कारखान्यामुळे युवा वर्गाला रोजगार उपलब्ध होणार असून यासोबतच इतरही उद्योग लातूर येथे येण्यास मदत होईल, असे आमदार संभाजी पाटील-निलंगेकर म्हणाले. या कारखान्यात 120 वंदे भारत रेल्वे तयार केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठवाडा रेल्वे कोच कारखाना हा लातूरसाठी प्रगतीचे दालन उपलब्ध करून देणारा विकासमार्फत ठरणार आहे. या कारखान्यामुळे मराठवाड्यातील युवा वर्गाला रोजगाराची संधी निर्माण होतील, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यावेळी म्हणाल्या.
प्रारंभी रेल्वेचे मुख्य कारखाना अभियंता सुबोधकुमार सागर यांनी मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याबाबत सविस्तर माहिती दिली. रेल्वे मंत्रालयाच्या मालकी असलेला या कारखान्यासाठी सुमारे 350 एकत्र जागा उपलब्ध करून देण्यात आली असून याठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रेल्वे कोच निर्मिती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठवाडा रेल्वे कोच कारखाना- ठळक मुद्दे व वैशिष्ट्ये*
· प्रकल्पाची किंमत: रु. 675.79 कोटी
· टप्पा-1 मध्ये 350 एकरांपैकी 110 एकरांवर बांधकाम.
· अद्ययावत यंत्रसामग्रीने सुसज्ज कारखाना
· अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुविधा असलेले कोच निर्मिती केली जाणार.
· रेल्वे कर्मचाऱ्यांची क्षमता वाढीसाठी प्रशिक्षण सुविधा.
· स्थानिक पुरवठादारांच्या क्षमता वाढीसाठी मदत.
· पहिल्या टप्प्यात 120 वंदे भारत ट्रेनचे कोच निर्मिती होणार.