• Thu. May 1st, 2025

लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही काळजी घ्या, मी पुढे तुमची काळजी घेते; जिल्ह्यातील नेत्यांसमोर पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य 

Byjantaadmin

Mar 9, 2024

बीड : मी सध्या ‘माजी’ आमदार आणि माजी ग्रामविकास मंत्री आहे, त्यामुळे मला तुम्हाला काहीच देता येत नाही, पण इथे बसलेल्या किती जणांनी ‘माजी’ केलं हे सांगताही येत नाही असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं. लोकसभेच्या निवडणुकीत माझी तुम्ही काळजी द्या, मी पुढे तुमची काळजी घेते असंही सूचक वक्तव्य त्यांनी उपस्थित नेत्यांना आणि लोकांना उद्देशून केलं. पंकजा मुंडे यांनी केलेल्या या वक्तव्यावर आता चर्चा सुरू आहे. पंकजा मुंडे या लोकसभा निवडणूक (Beed Lok Sabha Election) लढवणार हे जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे.  

बीड जिल्ह्यातल्या शिरूर येथे सिद्धेश्वर देवस्थान संस्थांच्या हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्याला भाजप नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे यांची उपस्थिती होती. यावेळी भाषणामध्ये बोलताना पंकजा मुंडे यांनी मी सध्या माजी असून तुम्हाला काय देऊ असा प्रश्न मला पडतो असं म्हणाल्या. मंचावर बसलेले सुरेश धस, बाळासाहेब आजबे, प्रीतम मुंडे हे सत्ताधारी आहेत. त्यामुळे आजी लोकांनी माजी लोकांची काळजी घ्यावी असं म्हणत लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या, पुढे मी तुमची काळजी घेईल असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. 

मला किती जणांनी मिळून पाडलं हे सांगता येत नाही

मला कोणी माजी केलं हे आता सांगता पण येत नाही, कारण सगळेच एकत्र आले आहेत. पण जेव्हा माझ्यावर रेड पडली तेव्हा माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी 11 कोटी रुपये जमा केले, हे माझं लोकांच्या हृदयाशी जोडलेलं नातं आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या. सरकार सध्या तीन इंजिनने जोडलेलं असून काही वेळ हे इंजिन एकमेकांना भिडले होते, मात्र आता ते बरोबर पटरीवर चालत आहेत असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. 

आजी नेत्यांनी माजी नेत्यांची काळजी घ्यावी

आजी नेत्यांनी माजी नेत्यांची काळजी घ्यावी, कारण त्यांना ‘आजी’ करण्यात ‘माजी’ नेत्यांचाही हात असतो असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडेंचे वक्तव्य हे स्टेजवरील उपस्थित असलेल्या नेत्यांना उद्देशून होतं. 

बीडमधून पंकजा मुंडे लोकसभा लढणार? 

भाजपच्या लोकसभेच्या उमेदवारांची यादी जवळपास निश्चित झाली असून त्यामध्ये अनेक ठिकाणचे खासदार बदलण्यात येणार आहेत. बीडच्या जागेचाही त्यामध्ये समावेश असून प्रीतम मुंडे यांच्या जागी पंकजा मुंडे यांनी निवडणूक लढावी अशी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची इच्छा असल्याची माहिती आहे. त्यामुळेच की काय भाजपच्या यादीत पंकजा मुंडे यांचे नाव असल्याची जोरदार चर्चा आहे. 

या आधी आपण राज्याच्या राजकारणातच राहणार, प्रीतम मुंडे या दिल्लीत जाणार असं विश्वासाने सांगणाऱ्या पंकजा मुंडे यांचा सूर काहीसा बदलल्याचं दिसून येतंय. लोकसभेची निवडणूक कोण लढावी हे दिल्लीतून ठरवलं जाणार असून त्याप्रमाणे आपण काम करू अशी भूमिका आता पंकजा मुंडे यांनी घेतल्याचं दिसतंय. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *