• Thu. May 1st, 2025

लातूरच्या लिंगायत समाजाच्या आगळ्या वेगळ्या सत्काराने  भारावून गेलो : आ. जयंत पाटील 

Byjantaadmin

Mar 9, 2024

लातूरच्या लिंगायत समाजाच्या आगळ्या वेगळ्या सत्काराने  भारावून गेलो : आ. जयंत पाटील 

लातूर : आपल्या प्रदीर्घ राजकीय जीवनात आपण अनेक सत्कार सोहळे पाहिले , सोहळ्यांना आवर्जून उपस्थित राहिलो. पण समस्त लातूर जिल्हा लिंगायत समाजाच्या आगळ्यावेगळ्या सत्काराने भारावून गेल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार ) प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी केले. 

समस्त लिंगायत समाजाच्या वतीने शुक्रवारी लातूरच्या दौऱ्यावर आलेल्या आ. जयंत पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा लिंगायत समाजातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील  ज्येष्ठ व्यक्तिमत्व असणाऱ्या उदयकुमार चौंडे यांच्या औसा रोडवरील ‘ जगन्नाथ ‘ निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील, राष्ट्रवादीचे नूतन जिल्हाध्यक्ष संजय शेटे, उदयकुमार चौंडे यांसह लिंगायत समाजातील विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या सत्कार सोहळ्यात आ. जयंत पाटील यांना महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा, वचनसाहित्य देऊन बसवण्णांच्या वचनांचा मंत्रघोष करत  लिंगायत पद्धतीने पुष्पवृष्टी करून त्यांचा सन्मान करण्यात आला.  हा सन्मान सोहळा संपन्न होत असताना टाळ्यांच्या गजरांनी  संपूर्ण सभामंडप दणाणून गेला होता. हा सोहळा पूर्णतः  राजकारण विरहित, स्नेहमिलन प्रकारचा होता. सोहळ्याला लिंगायत समाजातील विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक , उद्योग , व्यापार क्षेत्रात कार्यरत असणारे अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते. या सोहळ्याने लिंगायत समाजाची एकता सर्वांना पहायला  – अनुभवायला मिळाली. 

                       या सत्कार सोहळ्याला उत्तर देताना आ. जयंत पाटील यांनी आपण अक्षरशः भारावून गेल्याचे सांगितले. लिंगायत समाजाचे अल्पसंख्यांक दर्जा , स्वतंत्र धर्म मान्यतेसह विविध प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. त्याची सोडवणूक करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, पण तोपर्यंत लिंगायत समाजाने थोडी कळ  सोसावी असे ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार निश्चित येणार आहे. आपले सरकार आल्याबरोबर या प्रश्नांची सोडवणूक केली जाईल. महात्मा बसवेश्वरांनी संपूर्ण जगाला दिशा दाखविण्याचे महान  कार्य केले आहे. सन  १९९० साली मला स्वतःला उमेदवारी मिळवून देण्यासाठी ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांनी मोलाची मदत केली होती. माझी राजीव गांधींशी भेट घालून देऊन त्यांनी मला विधानसभेचे तिकीट मिळवून दिल्याची आठवणही आ. पाटील यांनी काढली. नूतन जिल्हाध्यक्ष संजय शेटे उत्तम कार्य करतील असा आपल्याला विश्वास असल्याचे त्यांनी बोलून दाखविले . 

संजय शेटे यांनी यावेळी बोलताना समाजाची शक्ती पाठीशी असल्याशिवाय कोणीही मोठा होऊ शकत नाही,असे सांगितले. उदय चौंडे यांनी अत्यंत मोठ्या मनाने  राष्ट्रवादी भवनसाठी  जागा उपलब्ध करून दिल्यामुळेच कार्यालयाचे उदघाटन  होऊ शकले असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमाकांत कोरे यांनी तर आभार   प्रदर्शन उदय चौंडे यांनी केले.  या सोहळ्यात वीरशैव लिंगायत समाज, कपिलधार सेवा संघ , लिंगायत सेवा संघ यांसह  विविध संघटनांच्या वतीने आ. जयंत पाटील यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी राजाभाऊ हालकुडे , शिवलिंगप्पा जवळे, बंडाप्पा जवळे, राजकुमार कत्ते ,  डॉ.अरविंद भातांब्रे, बालाजी पिंपळे, अक्षयकुमार चौंडे यांसह  विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *