आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध आता राजकीय पक्षांबरोबरच सर्वासामान्यांनाही लागले आहेत. जागावाटपांवरून राजकीय पक्षांच्या बैठकांवर बैठक सुरू आहेत. तर इच्छुक उमेदवारांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. निवडणूक आयोगाकडून लवकरच लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप पाहता, केंद्रीय निवडणूक आयोगाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार लोकसभा निवडणुकीसाठीच्या आचारसंहितेच्या काळात आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत राजकीय नेत्यांना प्रशासकीय विभागांच्या वेबसाईटवरून आपले फोटो काढावे लागणार आहेत.याशिवाय या निवडणुकीत प्रचार करताना धर्म, जात, भाषेच्या आधारावर उमेदवारांनी किंवा राजकीय पक्षांनी मतं मागू नयेत. कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील अशी विधाने करून नयेत, धार्मिक स्थळांचा निवडणूक प्रचारासाठी उपयोग करू नये, असे आयोगाने म्हटले आहे. शिवाय , आचारसंहितेच उल्लंघन झाल्यास संबंधित उमेदवारावर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला गेला आहे.निवडणूक आयोगाकडून कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते, यानंतर तत्काळ आचारसंहिताही लागू होईल. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून उमेदवारा तसेच राजकीय पक्षांसाठी मार्गदर्शक सूचना वारंवार जारी केल्या जात आहेत. या अगोदर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी उमेदवारांसाठी प्रचारादरम्यान कोणती दक्षता बाळगावी याबाबत सूचना केल्या होत्या.
