• Tue. Apr 29th, 2025

राजकारणात मोठ्या भूकंपाचे संकेत, अजित पवार यांचा एका बड्या नेत्यासोबत एकाच गाडीने प्रवास

Byjantaadmin

Mar 4, 2024

देशात LOKSABHA आता जसजशी जवळ येत आहे तसतशा घडामोडी वाढायला सुरुवात झाली आहे. राज्याच्या राजकारणात सातत्याने मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. याच घडामोडी आगामी काळात खूप वाढणार आहेत. विशेष म्हणजे या घडामोडींच्या माध्यमातून राजकारणात मोठे भूकंप देखील घडून येण्याचे संकेत मिळत आहेत. मोठमोठे नेते आपले पक्ष सोडून वेगळ्या पक्षात पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या रुपाने असा आपण पक्षप्रवेश बघितला. त्यानंतर आता पुणे जिल्ह्यात मोठं काहीतरी घडणार आहे. तसे संकेत मिळत आहेत. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील एका बड्या नेत्यासोबत एकाच गाडीने प्रवास केला आहे. याच नेत्याला अजित पवार गटातून लोकसभा निवडणुकीची उमेदवारीची संधी दिली जाण्याची चर्चा आहे. हा बडा नेता म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे शिवाजी आढळराव पाटील. शिवाजी आढळराव पाटील यांनी नुकतंच त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली होती. त्यानंतर आता अजित पवार आणि शिवाजी आढळराव पाटील यांनी एकाच गाडीने प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटील यांनी एकाच गाडीने प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार, मंत्री दिलीप वळसे पाटील आणि शिवाजी आढळराव पाटील यांनी एकाच गाडीने प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. विविध विकासकामांचं उद्घाटन आणि शेतकरी मेळाव्यासाठी या तीनही नेत्यांनी उपस्थिती लावली. त्यानंतर तीनही नेत्यांनी एकाच गाडीने प्रवास केला. या भेटीवर अजित पवार काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे. विशेष म्हणजे शिरुर लोकसभेच्या जागेतून शिवाजी आढळराव पाटील यांच्या उमेदवारीची देखील घोषणा आता होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

शिवाजी आढळराव पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

शिरुर लोकसभा मतदारसंघ हा सध्या प्रचंड चर्चेत आहे. महाविकास आघाडीकडून या मदारसंघात विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना लोकसभेचं तिकीट दिलं जाण्याची दाट शक्यता आहे. तर दुसरीकडे महायुतीकडून या मतदारसंघात कुणाला उमेदवारी देणार? याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. या मतदारसंघात शिंदे गटाचे नेते शिवाजी आढळराव पाटील यांची चांगली ताकद आहे. ते या मतदासंघासाठी आग्रही आहेत. पण सध्या शिरुरमध्ये राष्ट्रवादीचा विद्यमान खासदार असल्यामुळे महायुतीत ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी सुटण्याची शक्यता आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघ हा जागावाटपात अजित पवार गटाला मिळाला तरी शिवाजी आढळराव पाटील निवडणूक लढायला तयार आहेत, अशी चर्चा आहे. त्यामुळे शिवाजी आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतात का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. अढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला तर शिंदे गटाला तो मोठा धक्का असेल.

शिवाजी आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीच्या मोहिते पाटलांचा विरोध

अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करुन घड्याळ चिन्हावर निवडून आणण्यासाठी शिवाजी आढळराव पाटील यांची तयारी आहे, अशी सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे. पण शिवाजी आढळराव पाटील यांच्या पक्षप्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आक्षेप घेतलाय. शिवाजी आढळराव पाटील यांनी आपल्याला जेलमध्ये टाकण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्यासोबत आपलं अनेक वर्षांपासून राजकीय वैर आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला तर आपण राजकारण सोडू असं मोहिते पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे आता अजित पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. असं असताना आज चक्क अजित पवार आणि शिवाजी आढळराव पाटील यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

अजित पवार शिरुर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. अजित पवार मंचावर दाखल झाले तेव्हा शिवाजी आढळराव पाटील यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. कार्यक्रम संपल्यानंतर अजित पवार, शिवाजी आढळराव पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. गाडीतून प्रवास करताना काय चर्चा होते, ते देखील महत्त्वाचं आहे. तसेच शिवाजी आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतात का, त्यांच्या पक्षप्रवेशाची आज घोषणा होते का? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed