बारामती: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बुजुर्ग आणि सर्वात अनुभवी नेता अशी ओळख असलेल्या शरद पवार यांनी राजकीय मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आणि विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. यंदा अजित पवार भाजपसोबत असल्याने बारामतीची लढाई सुप्रिया सुळे यांच्यासाठी कधी नव्हे इतकी अवघड असेल. त्यामुळे शरद पवार स्वत: मैदानात उतरुन रणनीती आखताना दिसत आहेत. याचाच एक भाग म्हणून शरद पवार यांच्याकडून आता महादेव जानकर यांना सोबत घेतले जाण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी माढ्याची जागामहादेव जानकर यांच्यासाठी सोडण्याची तयारीही दाखवल्याचे सांगितले जाते.

बारामती, माढा या मतदारसंघांमध्ये महादेव जानकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. जानकर यांनी बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती तेव्हा त्यांना मोठ्याप्रमाणावर मतदान झाले होते. जानकरांची हीच ताकद लक्षात घेऊन शरद पवार यांनी महादेव जानकर यांच्यासोबत हातमिळवणी करण्याची तयारी दर्शविल्याचे समजते. येत्या 6 आणि 7 मार्चला MUMBAIत महाविकास आघाडीची जागावाटपाबाबत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत लोकसभेचे जागावाटप अंतिम होण्याची शक्यता आहे. या जागावाटपात माढा लोकसभा मतदारसंघ हा शरद पवार गटाला मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे महादेव जानकर सोबत आल्यास आम्ही माढ्याची जागा धनगर समाजाला द्यायला तयार आहोत, अशी भूमिका शरद पवार गटाने घेतल्याचे समजते. त्यामुळे आता महादेव जानकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाशी युती करणार का, हे पाहावे लागेल.
महादेव जानकर सोबत आल्यास काय फायदा होणार?
राज्यात 2014 साली शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले तेव्हा महादेव जानकर त्यांच्यासोबत होते. परंतु, ते सध्या महायुतीसोबत आहेत किंवा नाही, याबाबत जानकरांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नव्हती. सध्या माढा लोकसभेत भाजपचे विजयसिंह मोहिते-पाटील हे खासदार आहेत. त्यांच्या जागी भाजपकडून नवा उमेदवार रिंगणात उतरवला जाऊ शकतो. तर महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार गटाच्या वाट्याला येईल. स्वत: शरद पवार 2009 मध्ये माढ्यातून लोकसभेवर निवडून गेले होते. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेससाठी नेहमीच महत्त्वाचा ठरला आहे. परंतु, आता शरद पवार यांच्याकडून बारामतीची जागा सुरक्षित करण्यासाठी महादेव जानकर यांना माढ्यातून उमेदवारी दिली जाऊ शकते.
महादेव जानकर यांच्या पाठिशी धनगर समाजाची मोठी ताकद असल्यामुळे बारामती आणि माढा अशा दोन्ही ठिकाणी फायदा होऊ शकतो. जानकरांशी युती केल्यामुळे बारामतीत सुप्रिया सुळे यांचा विजय सुकर होईल. तसेच महादेव जानकरांनी माढ्याची जागा जिंकल्यास महाविकास आघाडीची आणखी एक जागा वाढू शकते.