गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, आता सुनेत्रा पवार यांनी दौंडमध्ये सोमवारी (दि.26) निवडणूक लढण्याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. दौंड मर्चंट असोसिएशन ,पतित पावन संघटना ,स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या व्यापारी बैठकीला सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. यावेळी त्या बोलत होत्या.

सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
काल इंदापूरमध्ये दादांनी सांगितलं आहे की, आपल्या विचाराचा खासदार द्या. आता तुम्ही समजून घ्यायचे ते घ्या, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघात तळ ठोकून आहेत. अजित पवार सुनेत्रा पवारांना (Sunetra Pawar) लोकसभा निवडणुकीत उतरवणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
सुनेत्रा पवार दौंड दौऱ्यावर
अजित पवारांनी काल शेतकरी मेळाव्यात घड्याळाचे बटन दाबून राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी करा, असे आवाहन केले होते. त्यातच आज सुनेत्रा पवारांनी काही ओळखायच आहे ते ओळखा असे विधान केले आहे. आगमी काळात नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगताना दिसू शकतो. आज सुनेत्रा पवार दौंडच्या दौऱ्यावर आहेत.शिवाय विविध ठिकाणी सुनेत्रा पवार भेट देणार आहेत.
सुनेत्रा पवार यांचे भावी खासदार म्हणून बॅनर
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे बारामतीमध्ये भावी खासदार म्हणून बॅनर लागले आहेत. बारामतीतील आमराई परिसरात हे बॅनर्स लागले होते. आमराईतील सचिन काकडे या कार्यकर्त्याने सुनेत्रा पवार यांचे भावी खासदार बॅनर लावलेत. मागील काही दिवसांपासून सुनेत्रा पवार या वेगवेगळ्या परिसरात दौरे करत आहे सोबतच विकासकामाचंदेखील उद्घाटन करताना दिसत आहे.
अजितदादांवर बारामतीकरांचे प्रेम : सुनेत्रा पवार
बारामतीकरांचे पाठबळ कायमस्वरूपी राहणार आहे. अजितदादांवर बारामतीकरांचे प्रेम आहे, असे सुनेत्रा पवारांनी म्हटलंय. सध्या बारामतीत सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा आहे. सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उभं केलं जाणार अशी चर्चा रंगलेली असतानाच बारामतीकर आपल्यालाच साथ देणार असा विश्वास सुनेत्रा पवारांनी व्यक्त केलाय.