• Tue. Apr 29th, 2025

गांधीधाममध्ये EVMचे शेल उघडलेले पाहून भरत सोलंकी यांनी गमछाने स्वत:चा गळा आवळला

Byjantaadmin

Dec 8, 2022

विधानसभेच्या 6 जागा असलेल्या कच्छ जिल्ह्यातील गांधीधाम जागेचे उमेदवार भरत सोलंकी यांनी भुज येथे सुरू असलेल्या मतमोजणीदरम्यान यंत्रणेवर गंभीर आरोप करत नाराजी व्यक्त केली. ते मतमोजणी केंद्रातच ठाण मांडून बसले. नाराजीचे कारण म्हणजे पाचव्या फेरीदरम्यान EVMचे शेल तुटलेले आढळून आले आणि यावरच उमेदवार भरत सोलंकी यांनी आक्षेप घेतला. त्यांनी EVMशी छेडछाड झाल्याचा गंभीर आरोप करून तीव्र निषेध नोंदवला व गमछाने स्वत:चा गळा आवळण्याचा प्रयत्न केला.

तेथे तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना रोखले असले, तरी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी उमेदवार भरतभाई यांची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपच्या आमदार मालतीबेन माहेश्वरी सध्या काँग्रेस उमेदवाराविरुद्ध केवळ 469 मतांनी आघाडीवर आहेत. ताज्या माहितीनुसार भाजपला 3217, तर काँग्रेसला 2748 मते मिळाली आहेत.

कोण आहेत भरत सोलंकी?

भरत सोलंकी हे नववी पास आहेत. त्यांचे आजोबा आणि वडील कांडला बंदराजवळील जिरा बंदराजवळ हरियास म्हणून काम करत. ते मिठाच्या आगरात काम करायचे. त्यांची आई सोनलबेन मीठ बारीक करायच्या. ते देशी मीठ तयार करायला शिकले. गांधीधाममध्ये शाळा सुटल्यावर ते थेट मीठ आगर गाठायचे. भरत सोलंकी यांनी काही दिवसांपूर्वी दिव्य भास्करशी संवाद साधताना मी मिठात जन्मलो आणि मिठामध्येच मरणार असल्याचे सांगितले. आजही गरज पडल्यास मी मीठ आगरात असेच काम करू शकतो. मी गांधीधाममध्ये तीन ते चार सॉल्ट युनिट्सखाली मिठाची किरकोळ विक्री करतो, अशी माहितीही त्यांनी दिली होती.

‘चक्रीवादळात कुटुंबाचे 9 सदस्य गमावले’

भूतकाळातील वाईट दिवसांची आठवण करून देताना भरत सोलंकी म्हणाले की, 9 जून 1998 रोजी कच्छमध्ये आलेल्या विनाशकारी चक्रीवादळात मी कुटुंबातील 9 सदस्य गमावले. चुलत भाऊ आणि मामासह कुटुंबातील सदस्यांचे निधन झाले होते. त्यावेळी मी संकटात होतो आणि देवाच्या कृपेने त्या नैसर्गिक आपत्तीतून मी वाचलो. विनाशानंतर माझ्या पायावर परत उभे राहण्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागला. एक काळ असा होता की भाड्याचे घर रिकामे केल्यावर दुसरे घर मिळत नव्हते. कुटुंबासह गांधीधामच्या फूटपाथवर तीन दिवस काढावे लागले. मात्र लोकांच्या सहानुभूतीमुळे आज मी मजबुतीने उभा आहे आणि त्यामुळेच आता लोकांची सेवा करण्याची संधी मिळाल्याचा आनंद होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed