• Tue. Apr 29th, 2025

रब्बी पीक स्पर्धेसाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करा

Byjantaadmin

Dec 8, 2022

रब्बी पीक स्पर्धेसाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करा
• जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांचे आवाहन
• तालुका कृषि अधिकाऱ्यांकडे करता येणार अर्ज
• ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस आणि तीळ पिकांचा समावेश

लातूर,  (जिमाका):कृषि विभागाकडून सन 2020-21 पासून रब्बी हंगामात राज्यांतर्गत पीक स्पर्धांचे आयोजन करण्यात असून या स्पर्धेसाठी शेतकऱ्यांनी 31 डिसेंबर 2022 पर्यंत तालुका कृषि अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.

लातूर जिल्ह्यातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस आणि तीळ या पिकांसाठी रब्बी पीक स्पर्धा होणार आहे. तालुका कृषि अधिकाऱ्यांमार्फत या स्पर्धेचे आयोजन केले जाणार असून शेतकऱ्यांना किमान दहा आर. क्षेत्रावर सलग लागवड करणे आवश्यक आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देवून त्यांचा गौरव केल्यास शेतकऱ्यांची इच्छाशक्ती, मनोबल वाढेल. आणखी उमेदीने नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल व उत्पादकतेमध्ये मोलाची भर पडेल, या उद्देशाने राज्यात रब्बी पीक स्पर्धा आयोजित केली जाते.

तालुकास्तरावर सर्वसाधारण गटासाठी एका पिकाकरीता दहापेक्षा कमी व आदिवासी गटात पाचपेक्षा कमी अर्ज आल्यास स्पर्धा रद्द केली जाणार जाईल. स्पर्धेसाठी संबंधित गावांमध्ये पीक कापणी समिती नेमली जाईल. राज्यस्तरावरील स्पर्धेचे निकाल कृषि आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समिती घोषित करेल. या स्पर्धेची सविस्तर माहिती कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांच्याकडे मिळेल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्जासोबत 300 रुपये प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, सातबारा, आठ अ, आदिवासी असल्यास जात प्रमाणपत्र जोडावे लागेल.

अशी आहे बक्षिसांची रक्कम
रब्बी पीक स्पर्धेसाठी तालुकास्तरावर प्रथम क्रमांकाचे बक्षीस पाच हजार रुपये, द्वितीय बक्षीस तीन हजार रुपये आणि तृतीय बक्षीस दोन हजार रुपयांचे राहील. जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाचे बक्षीस दहा हजार रुपये, द्वितीय बक्षीस सात हजार रुपये आणि तिसरे बक्षीस पाच हजार रुपये राहील. तसेच राज्यस्तरावर प्रथम क्रमांकाचे बक्षीस पन्नास हजार रुपये, द्वितीय बक्षीस चाळीस हजार रुपये आणि तिसरे बक्षीस तीस हजार रुपये राहणार आहे.

*गावपातळीवर असणार पीक कापणी समिती*
रब्बी पीक स्पर्धेसाठी गावपातळीवर पीक कापणी समिती नेमण्यात येणार आहे. यामध्ये पर्यवेक्षण अधिकारी समितीच्या अध्यक्षस्थानी असतील, तसेच कृषि सहाय्यक हे सदस्य सचिव राहतील. लाभार्थी शेतकरी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रगतशील शेतकरी, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक या समितीमध्ये राहतील.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अशा आहेत अटी
• किमान दहा आर. क्षेत्रावर सलग पीक लागवड आवश्यक
• कोणतेही शेतकरी स्पर्धेत भाग घेवू शकतात
• एकापेक्षा जास्त पिकांसाठी सहभाग घेता येईल
• स्पर्धेचे प्रवेश शुल्क 300 रुपये राहील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed