• Wed. Apr 30th, 2025

खाकी वर्दीवर रंगीत फेटे, बदलीनंतर निरोप सोहळे बंद करा, पोलिस महासंचालक रश्मी शुक्लांचे आदेश

Byjantaadmin

Feb 22, 2024

मुंबई : एका पोलिस ठाण्यातून किंवा जिल्ह्यातून दुसरीकडे बदली झाल्यास, संबंधित पोलिस अधिकाऱ्याला निरोप देताना कौतुकसोहळा आयोजित केला जातो. खाकी गणवेशावर रंगीत फेटे बांधणे, पुष्पवर्षाव, किंवा या अधिकाऱ्याला सरकारी वाहनात बसवून ते वाहन दोऱ्या बांधून ओढण्याचे प्रकार केले जातात. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या अशा प्रकारांची पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी गंभीर दखल घेतली असून, बदल्यांनंतरचे असे सोहळे बंद करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

मुंबईसह महाराष्ट्र पोलिस दलात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची काही ठरावीक कालावधीनंतर बदली केली जाते. आपण किती चांगले अधिकारी होतो, हे भासवण्यासाठी बदली करून जाणारे पोलिस स्वतःचा सत्कारसोहळा आयोजित करून घेतात. जणू संबंधित अधिकारी पोलिस दलातून सेवानिवृत्तच होत आहे, अशा पद्धतीने हा कार्यक्रम केला जातो. रंगीत फेटे बांधणे, फुलांचा वर्षाव करणे आणि या अधिकाऱ्याचे सरकारी वाहन दोरी बांधून ओढत नेणे, असे प्रकार अलिकडे वाढले आहेत. आपली प्रतिमा किती चांगली आहे हे भासवण्यासाठी या कार्यक्रमाचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केले जातात.हे प्रकार पोलिस दलाच्या प्रमाणित कार्यपद्धतीला अनुसरून नसल्याचे स्पष्ट करत, बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे निरोपसोहळे टाळण्याचे आदेश पोलिस महासंचालक शुक्ला यांनी राज्यातील पोलिसांना दिले आहेत. अशा प्रकारचा कोणताही कार्यक्रम होणार नाही याची दक्षता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे त्यांनी आदेशात नमूद केले आहे. त्याचबरोबर असे सोहळे कुणी आयोजित केल्याचे आढळल्यास, संबंधित पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

‘कर्तृत्वाचा होतो सन्मान!’

‘सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी निरोप समारंभाचे व्हिडीओ पोस्ट केले जातात. मात्र यातून प्रसिद्धी कमी आणि चेष्टा, उपहासच अधिक होतो. सर्वसामान्य नागरिक अशा दिखाऊ गोष्टींचा नाही, तर चांगल्या कामांचा, पोलिसांच्या कर्तृत्वाचा सन्मान करतात’, असे शुक्ला यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed