शारदा सेमी इंग्लिश स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
लातूर- येथील शारदा सेमी इंग्लिश स्कूलमध्ये रॉयल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
अध्यक्षस्थानी प्राचार्य एल. टी. पुरी होते. यावेळी मुख्य समन्वयिका अनघा पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख दर्शना देशमुख, स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख रोहित जाधव उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थी विविध महापुरुषांच्या वेशभूषेत उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचे गीत, पोवाडे गायले तर काही विद्यार्थिनींनी नृत्यातून पाळणा सादर केला. विद्यार्थ्यांनी वक्तृत्त्व स्पर्धेतही सहभाग नोंदवला. यावेळी लिंबराज गायकवाड, रोहिणी कदम व रोहित जाधव या शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य पुरी यांनी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना शिवचरित्रातील अनेक घटना व प्रसंग सांगितले.यानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. वक्तृत्त्व स्पर्धेत गौरवी धाराशिवे प्रथम, गौरवी शिंदे द्वितीय व आनंदी टमके तृतीय आली. चित्रकला स्पर्धेत कार्तिकी जाधव, विराज जाधव, वेदांती औरादे, पार्थ सुतार, तनिष्का हंचाटे, ऐश्वर्या कोरे, मयुर महामुनी, श्रुती केंद्रे यांनी पारितोषिक पटकावले.
पोवाडा गायनात अर्णव घोगरे, श्रीकांत चाकोते व भक्ती मिसे यांना बक्षीस मिळाले तर कराटे स्पर्धेत तनिष्का हंचाटे प्रथम हिने क्रमांक पटकावला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल नडगिरे तर प्रास्ताविक ललिता दरेकर यांनी केले. आभार अनिता रायमल यांनी मानले. यावेळी प्राचार्य पुरी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्यने उपस्थित होते.
