• Thu. May 1st, 2025

मराठा आरक्षण ; तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं!मराठा आरक्षण

Byjantaadmin

Feb 20, 2024

मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न आता काही अंशी निकालात निघाला आहे. राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर होण्याची चिन्हे आहेत. थोड्याचवेळात विधानसभा आणि विधानपरिषेदच्या पटलावर ठेवले जाईल. त्यानंतर मराठा आरक्षणावर सविस्तर चर्चा होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे गटनेते मराठा  आरक्षणासंदर्भाती आपापली भूमिका मांडतील. या चर्चेअंती मराठा आरक्षण विधेयक मंजूर करवून घेण्यासाठी मतदान घेतले जाईल. यावेळी मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्यास ते राज्यपालांकडे स्वाक्षरीसाठी पाठवले जाईल. त्यानंतर मराठा आरक्षण विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल.

Q. 1) मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे का?

होय. महाराष्ट्रात  मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा विशेष अधिवेशनाद्वारे राज्य सरकारने केली आहे. 

Q. 2) मराठा समाजाला किती टक्के आरक्षण मिळणार?

मराठा समाजाला दहा टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.

Q. 3) मराठा समाजाला कुठे कुठे आरक्षण मिळणार?

मराठा समाजाला नोकरीत 10 टक्के, आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण मिळणार आहे

Q. 4) मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण द्यावं ही मागणी मान्य झाली आहे का?

नाही. मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण हे मागास प्रवर्गातील नाही, ते स्वतंत्र संवर्गातील आहे. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गाला मिळत असलेल्या सगळ्याच सवलती लागू होणार नाहीत.

Q. 5) मराठा आरक्षण कोर्टात टिकणार का?

मराठा आरक्षण कोर्टात टिकावं यासाठी राज्य सरकारने विशेष खबरदारी घेतल्याचं सांगितलं आहे. त्यासाठी मागास आयोगाने इंद्रा साहनी खटल्याचा आधार घेतला आहे. अपवादात्मक परिस्थितीत आरक्षणाची 50 टक्के मर्यादा ओलांडता येते. त्यानुसारच मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिलं आहे

Q. 6) मराठा समाजाच्या दहा टक्के आरक्षणामुळे राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली आहे का?

होय. मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिल्यामुळे राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली आहे. महाराष्ट्रात आधीचे 52 टक्के आरक्षण आहे, त्यामध्ये आता या दहा टक्के आरक्षणाची भर पडली आहे.

Q. 7) मराठा समाजाला कोणकोणत्या नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळेल?

या आरक्षणामुळे मराठा समाजाला सरकारी शाळा, मंत्रालय, क्षेत्रीय कार्यालये, जिल्हा परिषद, विद्यापीठे आणि इतर सरकारी कार्यालयांमधील नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण मिळणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरल्या जाणाऱ्या पदांमध्ये आरक्षणाचा लाभ मिळेल.

Q. 8) मराठा समाजाला शैक्षणिक प्रवेश घेताना कुठे कुठे आरक्षण मिळेल?

राज्यातील सर्व सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी १० टक्के आरक्षण लागू होईल.

Q. 9) मराठा समाजाला राजकीय आरक्षण मिळाले आहे का?

नाही. मराठा समाजाला कोणत्याही प्रकारचे राजकीय आरक्षण मिळालेले नाही. राज्यातील त्याच्या संख्याबळानुसार या समाजास पुरेसे प्रतिनिधित्व असल्यामुळे, या समाजाला राजकीय क्षेत्रात आरक्षण देण्याची गरज नाही, असे राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालात म्हटले आहे.

Q. 10) मराठा समाजाचे आरक्षण कधीपासून लागू होणार?

विधानसभा आणि विधानपरिषेद मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर ते सहीसाठी राज्यपालांकडे पाठवले जाईल. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल आणि राज्यात मराठा आरक्षण तातडीने लागू होईल.

Q. 11) मराठा आरक्षण केंद्रात लागू असेल का?

नाही. राज्य विधिमंडळाने मंजूर केलेले मराठा आरक्षण हे केंद्रात लागू नसेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *