एसटी चालवत (ST Driver) असतानाच चालकाला हृदयविकाराचा (Heart Attack) धक्का बसला. मात्र, त्यातही प्रसंगावधान दाखवत चालकाने एसटी दुभाजकावर घालून गाडी थांबवली आणि ३१ प्रवासांचे प्राण वाचविले. मात्र, उपचारावेळी चालकाचा मृत्यू झाला.पुणे- बंगळूर राष्ट्रीय (Pune-Bangalore National Highway) वारुंजीच्या हद्दीत काल सायंकाळी ही घटना घडली. राजेंद्र विष्णू बुधावले (रा. सुळेवाडी, ता. खानापूर, जि. सांगली) असे या एसटी चालकाचे नाव आहे.

विटा आगाराची विटा ते स्वारगेट एसटी घेऊन चालक राजेंद्र बुधावले व वाहक फारुक शेख कडेगावमार्गे आले. कऱ्हाड बस स्थानकातून एसटी साताऱ्याकडे जाण्यासाठी निघाली. त्यावेळी एसटीत ३१ प्रवासी होते.महामार्गावर वारुंजीच्या हद्दीत चालक बुधावले यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. त्यामुळे त्यांनी धावती एसटी दुभाजकावर घातली. त्यामुळे एसटी तेथेच थांबली. एसटी थांबल्यामुळे वाहक शेख केबीनजवळ गेले. त्यावेळी चालक बुधावले यांना प्रचंड घाम आला होता. चक्कर येत असल्याचे ते म्हणत होते. त्यामुळे वाहक शेख यांनी तातडीने प्रवाशांना खाली उतरवून दुसऱ्या एसटीत बसवले.चालक बुधावले यांना रिक्षातून खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतानाच बुधावले यांचा मृत्यू झाला. प्रवाशांचे प्राण वाचविणाऱ्या बुधावलेंच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. एसटी वाहक फारुक कासीम शेख (रा. विटा) यांनी शहर पोलिसात त्याची फिर्याद दिली आहे.