• Thu. May 1st, 2025

भाजपात जाण्याच्या चर्चेवर अमितरावांकडून स्पष्टीकरण; विलासराव देशमुखांचा दिला ‘तो’ दाखला

Byjantaadmin

Feb 18, 2024

महाराष्ट्र काँग्रेसला सध्या घरघर लागली आहे. मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकीनंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडचिठ्ठी देत भाजपत प्रवेश केला होता. अशोक चव्हाणांसह आमदार अमित देशमुख सुद्धा भाजपत प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. या चर्चांना अमित देशमुखांनी पूर्णविराम देत स्वर्गीय, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा एक संदर्भ दिला आहे.”मी जिथं आहे, तिथं ठिक आहे. समाजाशी जोडलेली नाळ तोडून इकडं-तिकडं जाणं, हे महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसाला पटत नाही,” असं अमित देशमुखांनी म्हटलं आहे. लातूरमधील निवळी येथे विलास सहकारी साखर कारखाना परिसरात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळण्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी अमित देशमुख बोलत होते.या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, माजी मंत्री विश्वजित कदम, दिलीपराव देशमुख, अभिनेता रितेश देखमुख आणि अन्य नेते उपस्थित होते.

अमित देशमुख म्हणाले, “येणारा काळ हा काही सोपा नाही. हा संघर्षाचा काळ आहे. विलासराव देशमुख यांचं स्मरण केलं, तर आपल्याला एक लक्षात येईल की निष्ठा काय असते. निष्ठेनं समाजाची सेवा करत पक्षाचं काम केले जाते.”

“एकेकाळी विलासराव देशमुखांवर काँग्रेस पक्षाकडून कारवाई करण्यात आली. तोही काळ आपल्याला आठवतोय. काही काळ विलासराव देशमुखांना बेदखल करण्यात आलं होतं. पण, तेव्हा विलासराव देशमुखांनी माध्यमांना संवाद साधताना सांगितलं की, ‘मला तुम्ही काँग्रेस पक्षातून काढून टाकाल. मात्र, माझ्या रक्तातली काँग्रेस तुम्ही कशी काढणार?’ हे विलासराव देशमुखांचं वाक्य आहे. पण, मी जिथं आहे तिथं ठिक आहे,” असं म्हणत भाजपत जाण्याच्या चर्चांवर अमित देशमुखांनी स्पष्टीकरण दिलं.”समाजाशी जोडलेली नाळ तोडून इकडं-तिकडं जाणं हे महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसाला पटत नाही. यावर आपल्याला मात करायची आहे. आपल्याला सामान्य माणसाचा विश्वास संपादन करून, पुन्हा महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, शरद पवार, विलासराव देशमुख यांचे दिवस परत आणायचे आहेत. त्यासाठी सामान्य माणसापर्यंत महाराष्ट्राचा विचार पोहचवावं लागेल. यासाठी नेत्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. आज सगळे आपल्याकडे आस लावून पाहत आहेत,” असं आवाहन अमित देशमुखांनी केलं आहे.”सामान्य माणसाच्या आशा पूर्ण करायची जबाबदारी बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील यांच्यावर सोपवत आहे. आम्ही आपल्याबरोबर आहोत,” असं अमित देशमुखांनी म्हटलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *