केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पक्ष पारड्यात पडताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता थेट काकांविरोधात म्हणजे शरद पवार यांच्या विरोधातदंड थोपटले आहेत. बारामतीमध्ये केलेल्या वक्तव्यानंतर सडकून टीका झाल्याने पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार यांच्या विरोधात फारसे शब्द अजित पवार यांनी वापरले नव्हते. मात्र, पुन्हा आता अजित पवार यांनी शरद पवारांविरोधात थेट वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहे.

आता काकाका असे लिहून प्रचार केला पाहिजे
यामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवार यांनी शरद पवार यांना पाडलं पाहिजे असा स्पष्ट कानमंत्र दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. अजित पवार यांनी सांकेतिक शब्दांचा उलघडा केला. अजित पवार यांनी एक उदाहरण देत म्हणाले की सका पाटलांचा प्रचार करताना ‘पापापा’ असं लिहून प्रचार करत होते. आता काकाका असे लिहून प्रचार केला पाहिजे. पापापा म्हणजेच पाटलाला पाडलं पाहिजे. त्यामुळे आता अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात दोन हात केल्याचे स्पष्ट झाले आहे.
अजित पवारांच्या वक्तव्याने वाद रंगला
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये बारामती लोकसभा जागेवरून रणकंदन सुरू आहे. या जागेवरून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उतरवणार असल्याची चर्चा रंगली आहे. बारामती मतदारसंघाचा दौरा अजित पवार यांनी करताना शरद पवार यांच्यावर अत्यंत जहरी टीका केली होती. या टीकेनंतर विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा पलटवार करताना काकांच्या मरणाची वाट पाहत आहेत, तुमच्यासोबत काम केल्याची लाज वाटत असल्याचा घणाघाती हल्ला चालवला होता. यानंतर अजित पवार यांनी आपल्या वक्तव्याचा ध चा मा केल्याचा आरोप केला होता.
बारामतीसाठी शरद पवारांनी शड्डू ठोकला
त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघांवरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये संघर्ष सुरू आहे. दरम्यान, शरद पवार यांनीही आता बारामतीसाठी शड्डू ठोकला असून ते बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. त्यामुळे काका पुतण्यांच्या लढाईत बारामतीचा किल्ला कोणाच्या ताब्यात जाणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.