• Sun. May 4th, 2025

‘संकर्षण व्हाया स्पृहा’ कार्यक्रमाल लातूरकरांची भरभरून दाद !

Byjantaadmin

Feb 13, 2024

‘संकर्षण व्हाया स्पृहा’ कार्यक्रमाल लातूरकरांची भरभरून दाद !

·        महासंस्कृती महोत्सव, विभागीय 100 वे नाट्यसंमेलन

·        कविता, गीतांमध्ये रमले आबालवृद्ध प्रेक्षक

लातूर,  (जिमाका): बहिणाबाई चौधरी ते ग. दि. माडगूळकर लिखित गाणी, बालगीते आणि विविध व्यंगात्मक कवितांचे सादरीकरण करत अभिनेत्री स्पृहा जोशी आणि अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांनी लातूरकर प्रेक्षकांची मने जिंकली. निमित्त होते राज्य शासनाचा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने महासंस्कृती महोत्सव, तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विभागीय 100 वे नाट्यसंमेलनानिमित्त आयोजित ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ कार्यक्रमाचे.

सोमवारी महासंस्कृती महोत्सवात नाट्यदिंडीच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर दयानंद मैदान येथील कै. नटवर्य श्रीराम गोजमगुंडे रंगपिठावर झालेल्या या पहिल्याच जाहीर कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रारंभी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते अभिनेत्री स्पृहा जोशी आणि अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांचे स्वागत केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, अपर जिल्हाधिकारी सुनील यादव, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, संगीता टकले, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या लातूर शाखेचे शैलेश गोजमगुंडे यांच्यासह विविध विभागानाचे अधिकारी उपस्थित होते.

संकर्षण कऱ्हाडे याने सुरुवातीला त्याने लिहिलेली पहिली कविता सादर करत आपली हटके ओळख प्रेक्षकांना करून दिली.  त्यानंतर स्पृहा जोशीने आपल्या ओळखीची कविता सादर करत विद्यार्थ्यांची मनःस्थिती मांडली. तसेच कवियित्री बहिणाबाई चौधरी यांनी कविता कशी सुचते याविषयी केलेली ‘माझी माय सरस्वती..’ ही कविता सादर केली. संकर्षण कऱ्हाडे याने ग.दि. माडगूळकर यांची ‘ओटीत घातली मुलगी विहीणबाई…’ ही कविता सादर करून प्रेक्षकांसमोर नवरी मुलीच्या आईच्या मनात मुलीविषयी असणारी काळजी, प्रेम याविषयी मांडणी केली.

‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला…’ हे बालगीत सादर करून स्पृहा जोशीने उपस्थित बालप्रेक्षकांच्या टाळ्या मिळविल्या. तर संकर्षणने मुलांविषयी बापाची अवस्था सांगणारी ‘मोठं व्यायाचय व्हा न, इतकी घाई काय…’ ही कविता सादर करीत उपस्थितांना भावूक केले. त्याचसोबत ‘नही बोले तो सुनते नही…’ ही विनोदी कविता सादर करीत सर्वांना खळखळून हसविले. तसेच स्पृहा जोशी हिने शेपट्या ही विनोदी कविता सादर केली. करोना काळात वारी बंद असताना वारकऱ्यांची झालेली घालमेल मांडणारी ‘पंढरीच्या विठूराया कसं काय रे…’ ही कविता संकर्षणने सादर केली. तसेच स्पृहा जोशीने सादर केलेल्या ‘रखुमाई रुसली’ या गीताने या कार्यक्रमाचा समारोप झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *