महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रमुख नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी आमदारकीचा आणि काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याशिवाय ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचीही दाट शक्यता आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे, तर अशोक चव्हाणांबरोबर काँग्रेसचे जवळपास 10 ते 15 आमदारसुद्धा जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसला मोठं खिंडार पडणार असल्याचं दिसत आहे.या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसकडून हालचालींना वेग आला असून, डॅमेज कंट्रोलसाठी हायकमांडने राज्यातील महत्त्वाच्या काँग्रेस नेत्यांना कामाला लावले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसने 14 फेब्रुवारी रोजी मुंबईत काँग्रेसच्या सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे.

या बैठकीमुळे सध्या काँग्रेसोबत किती आमदार आहेत, हे स्पष्ट होणार आहे. शिवाय आमदारांचा कल कसा आहे जाणून घेण्यासही पक्ष नेतृत्वाला मदत होणार आहे. याशिवाय जे काँग्रेस आमदार सध्या काठावर आहेत, त्यांची मनं वळवण्याचाही प्रयत्न काँग्रेसकडून केला जाण्याची शक्यता आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून सर्व आमदारांना देण्यात आल्या आहेत, तर काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रत्येक आमदारांशी फोनद्वारे संपर्कही साधत आहेत.आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. महाराष्ट्रातही मागील काही दिवसांपासून काँग्रेसचे आमदार, नेते हे पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. त्यामुळे हायकमांड महाराष्ट्र काँग्रेस नेतृत्वावर नाराज असल्याचंही बोललं जात आहे.काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाणांनी दोन दिवसांत पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं आहे. अमित शाहांच्या संभाजीनगर येथील सभेतच अशोक चव्हाण यांचा अधिकृत भाजप प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.