• Sun. May 4th, 2025

उद्या ११ वाजता येतो सांगितलं अन्… पृथ्वीराजबाबांनी सांगितली ‘अंदर की बात’…

Byjantaadmin

Feb 12, 2024

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत. त्यांचा निर्णय पक्षातील अनेक सहकाऱ्यांसाठी धक्कादायक असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. कालपर्यंत लोकसभेच्या जागावाटपाला उपस्थित राहणारे अशोक चव्हाण आज अचानक पक्ष कसा काय सोडतात? याचं आम्हाला आश्चर्य वाटत असल्याचं सांगत अशोक चव्हाण यांच्या कालच्या संपूर्ण दिवसभराचा दिनक्रम काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला.

आज सकाळी राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण यांनी दुपारच्या सुमारास प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भाजपप्रवेशाचा निर्णय आणखी मी घेतलेला नाही. माझ्या पुढील राजकीय निर्णयासाठी २ ते ३ दिवसांचा अवधी लागेल, असं त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे गृहमंत्री अमित शाह १५ तारखेला महाराष्ट्र दौऱ्यावर येतायेत. त्याचवेळी अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी अटकळ बांधली जातीये. अशोक चव्हाण यांच्या पत्रकार परिषदेनंतर पृथ्वीराजबाबांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांचा निर्णय निश्चित वेदनादायी असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

काल काँग्रेसच्या बैठकीला हजर, उद्याही येतो म्हणून सांगितलं आणि…
अशोक चव्हाण यांनी अजून तरी त्यांची पुढची भूमिका स्पष्ट केलेली नाही. जन्मापासून काँग्रेस पक्षात काम केल्याचं सांगत होते. पक्षासाठी काम केल्याचा उल्लेख त्यांनी केला. परंतु पक्षानेही त्यांच्यासाठी खूप काही केलं. त्यांच्या राजीनाम्याचं वृत्त खरोखर वेदनादायी आहे.कालच आमचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला आले होते. त्या बैठकीत राज्यसभेच्या दृष्टीने रणनीती आणि लोकसभेच्या जागा वाटपावर चर्चा झाली. ते ही उपस्थित होते. संध्याकाळी ४ पर्यंत ते आमच्यासोबत होते. त्यावेळी त्यांच्या डोक्यात असं काही सुरू असेल याची आम्हाला कल्पना नव्हती. जाताना ते बाळासाहेब थोरात यांना सांगून गेले की उद्या सकाळी ११ वाजता पुन्हा बसून आपण चर्चा करू. काँग्रेस वाटपाच्या जागावाटपात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर प्रचंड मोठी जबाबदारी टाकली होती. मविआमध्ये ज्येष्ठ मंत्री म्हणून काम करत होते. त्यांनी हा निर्णय का घेतला? इतरांनी निर्णय का घेतला, हे आपल्याला माहिती आहे, त्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही, पण दिशा स्पष्ट आहे. भाजपकडूनही त्यांच्याबद्दलचे संकेत मिळत होते.

काँग्रेसचे आमदार कुठेही जाणार नाही
आम्ही आज बसून काँग्रेस आमदारांना संपर्क केलेला आहे. राज्यसभा उमेदवारी अर्ज भरताना उद्या आणि परवा आमदारांची बैठक घेतली जाईल. या सर्व परिस्थितीमध्ये आम्ही ज्या ज्या विधिमंडळाच्या नेत्यांच्या आमदारांना संपर्क केलेला आहे, त्यांनी सांगितलं आम्ही कुठेही जाणार नाही. मुद्दाम आमच्या पक्ष सोडण्याच्या वावड्या उठवल्या जातायेत. त्यांनी कुणीही विश्वास ठेऊ नये.

भाजपला निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास नाही, म्हणून तोडफोड सुरू
ज्या राजकीय घडामोडी घडतायेत, त्या का घडतायेत? हे लोकांना माहिती आहे. भाजपमध्ये निवडणुकांना सामोरे जाण्याची हिम्मत नाही. त्यामुळे विरोधी पक्षांचं विभाजन करून, त्यातून आपला काही हित साधता येतंय का हे भाजप पाहत आहे. मात्र नेतेमंडळी कुठेही गेले तरी मतदार कुठेही जाणार नाहीत, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्ते जे भाजपबरोबर जातील, त्यांच्यासोबत जाणार नाही, असं आवर्जून पृथ्वीराज बाबांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *