• Sun. May 4th, 2025

केंद्रांच्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख, त्यामुळेच अशोक चव्हाणांचा काँग्रेसला रामराम?

Byjantaadmin

Feb 12, 2024

शोक चव्हाण यांचं नाव असलेल्या आदर्श घोटाळ्याचा उल्लेख केंद्र सरकारने काढलेल्या श्वेतपत्रिकेत करण्यात आला आणि चारच दिवसात अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यांनी आपली राजकीय भूमिका उघड केली नसली तरीही ते भाजपमध्येच जाणार हे काही लपून राहिलं नाही. केंद्रातील भाजप सरकारच्या झटक्यानंतरच अशोक चव्हाणांनी आपली भूमिका बदलली असल्याची चर्चा आहे. 

आदर्श घोटाळ्याचा तपास सुरूच

केंद्रातील भाजप सरकारने काँग्रेसच्या कारकिर्दीवर श्वेतपत्रिका काढली आणि त्यानंतर काँग्रेसवर चांगलीच टीका केली. या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा तपास अद्याप सुरू असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळेच अशोक चव्हाणांच्या समोरील अडचणी संपल्या नसल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळेच की काय अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडली आणि ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. 

अशोक चव्हाणांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. केंद्र सरकारनं अलीकडेच काढलेल्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख आहे. छत्तीसगडच्या प्रचार सभेत पंतप्रधान मोदींनी 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला. त्यानंतर काहीच दिवसात अजित पवारांनी भाजपला साथ दिली. आता श्वेतपत्रिका येऊन काहीच दिवस झाले आहेत आणि अशोक चव्हाणांनी काँग्रेसला रामराम ठोकला.

काय आहे आदर्श घोटाळा? 

अशोक चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री असताना आदर्श घोटाळा उघड झाला होता. कारगिल युद्धातील विधवांसाठी तयार झालेल्या आदर्श सोसायटीत नातेवाईकांना फ्लॅट दिल्याचा चव्हाणांवर आरोप झाला होता. त्यामुळे त्यांना 2010 मध्ये मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं. त्यानंतर अशोक चव्हाणांच्या राजकीय कारकिर्दीला गळती लागल्याचे म्हटलं जाते.  

काँग्रेसमधून आमदारकीचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. राजीनामा दिला याला काही कारण नाही, सगळंच काही सांगता येणार नाही, बरीच वर्षे काँग्रेसमध्ये काम केल्यानंतर आता मला वेगळा पर्याय शोधावा असं वाटलं. त्यामुळे हा राजीनामा दिल्याचं अशोक चव्हाण म्हणाले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *