• Sun. May 4th, 2025

विखेंच्या पॅनलचा सुपडासाफ, भाजप नेत्याकडूनच ‘परिवर्तन’, म्हणतात शिर्डीत दबावाचं राजकारण बंद

Byjantaadmin

Feb 12, 2024

शिर्डी : शिर्डीत आता दबाव आणि दहशतीचं राजकारण चालणार नाही, असा टोला भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी विखे पिता पुत्रांचे नाव न घेता लगावला आहे. साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीची निवडणूक रविवारी पार पाडली. यामध्ये विखे पिता-पुत्रांच्या दोन्ही पॅनलला पराभवाची धूळ चारत विवेक कोल्हे पुरस्कृत परिवर्तन पॅनलने १७-० ने विजय मिळवला आणि विखे गटाचा सुपडा साफ केला.

विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वात झालेल्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलने अनेक वर्षांपासून विखे गटाच्या ताब्यात असलेल्या सोसायटीची सत्ता खेचून आणली. गणेश कारखान्यात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि भाजपचे विवेक कोल्हे यांनी एकत्र येत विखेंच्या ताब्यातून कारखाना खेचून आणला होता. त्यानंतर साई संस्थानच्या सोसायटी निवडणुकीत पुन्हा एकदा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खा. सुजय विखे यांना मोठा धक्का बसलाय.यावेळी विजयाचा आनंदोत्सव साजरा करताना विवेक कोल्हे म्हणाले, विठ्ठल पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा दणदणीत विजय झालाय. त्याबद्दल मी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करतो आणि सर्व सभासदांचे आभार मानतो. हा सर्वसामान्य कर्मचाऱ्यांचा विजय आहे. हा दहशत आणि अन्यायाविरुद्ध उठवलेल्या आवाजाचा विजय आहे. हा दडपशाही करून ५९८ लोकांवर अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात उठाव झाल्याचा विजय आहे. हा अनागोंदी कारभार चालू असलेल्या कार्यपद्धतीवरचा विजय आहे. हा कोणाचा तरी राजाश्रय घेऊन केलेल्या भ्रष्टाचार विरुद्धचा विजय आहे.”विठ्ठलराव पवार राजकीय दृष्ट्या अडचणीचा होतो म्हणून कुठेतरी राजकारणाचा प्रभाव वापरून त्यांना झाडू खात्यात टाकून झाडू मारायला लावून अपमानित करण्याचा प्रयत्न केला गेला. त्या विरोधात उठाव झाल्याचा हा विजय आहे. हा सर्व सामान्यांचा विजय आहे. या ठिकाणी विठ्ठलराव पवार यांनी जो विडा उचलला, त्याला सर्वच पक्षाच्या लोकांनी सहकार्य केलेलं आहे. अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारा जास्त जबाबदार असतो. म्हणून ज्यांच्यावर अन्याय होत होता, त्यांनी उठवलेला हा आवाज आहे. जे चुकीच्या लोकांना राजाश्रय देत होते त्यांच्यासाठी हा धडा आहे. त्यांनी याच्यातून धडा घ्यावा, इथून पुढे दबाव आणि दहशतीचे राजकारणच या शिर्डी- राहत्यात चालणार नाही, याचा संदेश देणारी ही निवडणूक होती, अशी प्रतिक्रिया युवा नेते विवेक कोल्हे यांनी विजयानंतर दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *