• Mon. May 5th, 2025

निखिल वागळे, असीम सरोदेंवरील हल्ल्याचे पडसाद; मराठी सिनेकलाकारांकडून निषेधाचा आवाज

Byjantaadmin

Feb 10, 2024

ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे, विधीज्ञ अॅड. असीम सरोदे , सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांच्या कारवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटू लागले आहेत. या हल्ल्याचा पत्रकार संघटना, सामाजिक संघटनांकडून निषेध व्यक्त होत आहे. मराठी कलाकारांनीदेखील या हल्ल्याचा निषेध केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहून कलाकारांनी भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. 

पुण्यात राष्ट्र सेवा दलाच्या साने गुरुजी स्मारक सभागृहात निर्भय बनो  सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही सभा झाल्यास उधळून लावण्याचा इशारा भाजपने दिला होता. मात्र, आयोजक सभा घेण्यावर ठाम राहिले. सभागृहाच्या दिशेने जात असताना ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे, अॅड. असीम सरोदे आणि डॉ.विश्वंभर चौधरी यांच्या कारवर वाटेतच हल्ला झाला. प्रवास करत असलेली कार चारही बाजूने फोडण्यात आली. त्याशिवाय शाई फेक करण्यात आली.

कलाकारांकडून निषेध व्यक्त 

मराठी अभिनेत्री वीणा जामकर हिने देखील फेसबुकवर हल्ल्याचा निषेध केला. निखिल वागळे, चौधरी सर, आणि असीम सरोदे ह्यांच्यावरील हल्ल्याचा जाहीर निषेध!!! असल्याची पोस्ट वीणा जामकर हिने केली पुण्यात झालेल्या या हल्ल्याचा निषेध कलाकारांनीदेखील केला आहे. चित्रपट निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता हेमंत ढोमे याने देखील हल्ल्याच्या विरोधात भूमिका घेतली. त्याने म्हटले की, जेव्हा विचारांनी लढता येत नाहीत तेव्हा झुंडशाही आणि हिंसेचा मार्ग पत्करला जातो. पुर्वापार हेच होत आलं आहे, आपण निर्भय होऊन काल जे केलंत त्याने विचार बळकट झाला आणि झुंडशाही हरली असल्याचे हेमंत ढोमे याने निखिल वागळे यांनी उद्देशून म्हटले. 

भाजप, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर अन् निखिल वागळेंवर गुन्हा दाखल

पुण्यात निखील वागळेंच्या गाडीवर झालेला हल्ला आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी झालेल्या गोंधळाबद्दल पुण्यात पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केलेत. पहिला गुन्हा पत्रकार निखिल वागळेंच्या गाडीवर हल्ला केल्याबद्दल भाजप आणि अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकांसह पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पुतण्यावर  दाखल करण्यात आला.  गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये भाजपचे माजी नगरसेवक दीपक पोटे, अजित पवार गटाचे माजी नगरसेवक दत्ता सागरे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे पुतणे दुष्यंत मोहोळ यांचा समावेश आहे. तर दुसरा गुन्हा कार्यक्रमाच्या ठिकाणी  आंदोलन केल्याबद्दल महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांसह पत्रकार निखिल वागळेंवरदेखील दाखल करण्यात आला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *