महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भाजप वारंवार अपमान करत आहे. यातून भाजपचा खरा चेहरा उघड झाला आहे. राज्यपाल कोश्यारी, भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्यानंतर आता राज्यातील मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही महाराजांबद्दल गरळ ओकली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत स्वाभिमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तत्काळ राजीनामे द्यावेत, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली असे निर्लज्जपणे भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी म्हणतो. राज्यपाल कोश्यारी यांनी तर छत्रपती शिवाजी महाराज जुने झाले असे म्हणत गडकरींशी तुलना केली. हे कमी होते की काय म्हणून राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महाराजांच्या आग्रा सुटकेची तुलना राज्यातील एका पक्षातील बंडखोरांशी केली. याचे प्रायश्चित्त त्यांना भोगावेच लागेल. इयत्ता पहिली ते आठवीत शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना केंद्र शासनाकडून मिळणारी शिष्यवृत्ती सरकारने अचानक बंद केली, असा आरोपही त्यांनी या वेळी केला.