महाराष्ट्र महाविद्यालयात कला स्थापत्य व मूर्तीशास्त्र परिषदेची सांगता
निलंगा – मध्ययुगीन व आधुनिक इतिहासाचा अभ्यास करणारे अभ्यासक, संशोधकांची महाराष्ट्रात कमी नाही परंतु प्राचीन इतिहास अभ्यासक व संशोधकांची मात्र प्रचंड वाणवा आहे, अशा संशोधकांची संख्या वाढली पाहिजे. मूर्ती व स्थापत्यशास्त्रावर आधारित झालेली ही इतिहासाची राष्ट्रीय परिषद दक्षिणेच्या इतिहासात नवे पान निर्माण करेल असा आशावाद इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सोमनाथ रोडे यांनी व्यक्त केला. ते निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने आयोजित दोन दिवशीय राष्ट्रीय परीषदेच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, संशोधकांनी मूळ साधनांचा वापर करून संशोधन करावे. मराठवाड्यात अनेक मंदिरे, शिल्प, स्थापत्य कलेचे उत्तम नमुने उपलब्ध आहेत, त्यांची पडझड होत आहे त्याचे संशोधन झाले तर भावी पिढीला ते संदर्भासाठी उपयुक्त होईल.
दोन दिवस चाललेल्या या राष्ट्रीय परिषदेसाठी इतिहास अभ्यासक, संशोधकांनी आपले संशोधनपर लेख सप्रमाण सादर केले. मंदिर स्थापत्य आणि मुर्तीशास्त्र या विषयाच्या अनुषंगाने दक्षिण भारतातील मंदिर स्थापत्य शैली व मूर्तीशास्त्र या विषयांवर संशोधन पर लेख सादर झालेत. यावेळी स्वा. रा. ती.म. विद्यापीठाच्या परभणी येथील उपकेंद्रातील संचालक डॉ.आत्माराम शिंदे यांनी पूर्वीच्या तगर आणि आजच्या तेर येथील मंदिरावर भाष्य केले. ते म्हणाले की, हे चाफाकार पद्धतीचे मंदिर आहे. महाराष्ट्रातील संस्कृतीची सुरुवात मराठवाड्यातूनच झाली असावी. त्यामुळे हे पहिले मंदिर असावे. कालांतराने मंदिर निर्मितीच्या शैली बदलल्या. पुरातन असलेली मंदिरे नष्ट होत आहेत हा सांस्कृतिक वारसा तरुण संशोधकांनी जपावा, शोधावा व जगासमोर आणावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या परीषदेत डेक्कन कॉलेज, पुणे येथील डॉ श्रीकांत गणवीर यांनी बौद्ध स्तूपाच्या संदर्भात अभ्यासपूर्ण विवेचन केले. तेलंगाना आणि पॅरिस येथील शिल्पसंग्रहालयातील शिल्पांच्या आधारे त्यांनी सिद्धार्थ गौतमाचा जन्म, यक्ष, शाक्य परंपरा, लोकपाल,धम्मचक्र प्रवर्तक सूक्त यावर प्रकाश टाकला. त्याचबरोबर खरोसा लेणी अभ्यास सत्रांमध्येही अभ्यासपुर्ण मांडणी करताना कोकण परीसरात आढळणारा जांभा दगड या लेणीपरासरात असुन या लेणी वेरुळ लेणींची प्रारंभिक अवस्था असावी असे मत व्यक्त केले. सकाळच्या निलंगा शहरातील प्रत्यक्ष मंदिर पाहणी अभ्यास सत्रात डॉ. अरविंद सोनटक्के यांनी मंदिर स्थापत्य व मंदिराच्या आतील व बाह्यांगावरील प्रतीमांवर ‘सूरसुंदरी, देवांगना की नायिका’ या विषयाच्या अनुषंगाने सप्रमाण मांडणी केली. या सत्राचा अध्यक्षीय समारोप डौ. नितीन बावळे यांनी केला.

या दोन दिवशी या इतिहास परिषदेतून अभ्यासक, विद्यार्थ्यांना एक वेगळी दृष्टी मिळाली. मंदिराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला अशी भावना समारोप समारंभाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. माधव कोलपुके यांनी व्यक्त केली. समारोपप्रसंगी विचार मंचावर मराठवाडा इतिहास परिषदेचे अध्यक्ष डॉ.नारायण सूर्यवंशी, महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य डॉ. शिवाजीराव गायकवाड, इतिहास विभागाचे माजी विभाग प्रमुख प्रा. मनोहर सांगवे, चर्चासत्राचे संयोजन सचिव डॉ. सुभाष बेंजलवार, प्रतिमा शास्त्र संशोधन परिषदेचे अध्यक्ष डॉ. अरविंद सोनटक्के, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे डॉ. ज्ञानेश्वर चौधरी, स्वा. रा.ती. म. वि. नांदेड इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष राहुल वरवंटीकर, आदींची उपस्थिती होती.
या परीषदेचे व समारोप समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. अजित मुळजकर, डॉ. नरेश पिनमकर, डॉ. हंसराज भोसले, डॉ.गोविंद शिवशेट्टे यांनी केले तर उपस्थिताचे आभार डॉ. सुभाष बेंजलवार यांनी मानले. या परिषदेच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व रासेयो स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.