निलंगा :- माणूस जात धर्माने नव्हे तर शिक्षणाने मोठा होतो. बुद्धी ही सर्वात श्रेष्ठ आहे .भटक्या विमुक्त ,वंचित ,उपेक्षित वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपले भविष्य उज्ज्वल करावे असे आवाहान निलंगा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपानराव अकेले यांनी केले.

निलंगा येथील श्रमिक विकास संस्था संचलित वेणूताई यशवंतराव चव्हाण प्राथमिक आश्रम शाळा व प्रतिभाताई पवार माध्यमिक आश्रम शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पालक मेळाव्यात ते बोलत होते. या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उदघाटन तहसिलदार श्रीमती उषाकिरण शृंगारे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ, समाजसेवक लिंबन महाराज रेशमे ,संस्थेचे अध्यक्ष विलास माने, सचिव विकास माने, माजी नगरसेविका सौ कलावती माने, संगांयो समितीचे अध्यक्ष शेषेराव मंमाळे आदी मंचावर उपस्थित होते. यावेळी बोलताना तहसीलदार उषाकिरण शृंगारे म्हणाल्या निलंगा येथील आश्रमशाळा भटक्या विमुक्त समाजात सकारात्मक बदल घडवून आणणारे संस्कार केंद्र असून येथे शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास केला जातो. यावेळी आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या वीटभट्टी खडीकेंद्रावरील कामगारांच्या मुलांनी व भटक्या विमुक्त वाडी वस्तीवरील बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी हिंदी मराठी गीतावर बहारदार नृत्य करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. याप्रसंगी मुख्याध्यापिका एस.टी. पंडित दिग्दर्शित मी सावित्री बोलते व सुपरवायझर डी. बी. जाधव दिग्दर्शित राष्ट्रीय एकात्मता याविषयावर सादर केलेल्या नाट्यछटा यास निमंत्रित मान्यवरांसह उपस्थित पालकांनी विशेष दाद दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका एस.टी. पंडित यांनी केले तर आभार मुख्याध्यापक व्हि.एम. गणेशवाडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्कृती विभाग प्रमुख दशरथ जाधव व अजय पाटील यांच्यासह आश्रमशाळेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.