• Mon. Apr 28th, 2025

शिवसेना आमदार अनिल बाबर यांच्या अंत्ययात्रेला जनसागर, कट्टर राजकीय विरोधकाचीही श्रद्धांजली

Byjantaadmin

Jan 31, 2024

सांगली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक मानले जाणारे शिवसेना आमदार अनिल बाबर यांचं निधन झालं. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबर हे सांगलीतील खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. बाबर यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील माजी आमदार सदाशिव पाटील यांनी अनिल बाबर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

शिवसेना आमदार अनिल बाबर यांच्या जाण्याने सांगली जिल्ह्यात राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. तालुक्याच्या विकासामध्ये अनिल बाबर यांचं मोठं योगदान आहे. तालुक्याचे विधायक नेतृत्व हरपलं असून मतदारसंघातील पाणी पोहोचवण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करू, अशा भावना सदाशिव पाटील यांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत.

अनिल बाबर यांचं आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झालं. पाणीदार आमदार म्हणून त्यांची संपूर्ण जिल्ह्यात ओळख होती. आमदार अनिल बाबर यांचे पार्थिव सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास विटा शहरात दाखल झाले. विटा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सजवलेल्या रथातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून अनिल बाबर यांनी सरपंच ते आमदार असा राजकीय प्रवास केला. त्यांच्या कार्यकर्त्यांची मोट ही मोठी होती. शिवसेनेतील फुटीवेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या जाण्याने संपूर्ण खानापूर आटपाडी तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या अंत्ययात्रेला हजारोंचा जनसमुदाय सहभागी झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed