मराठा आरक्षणाच्या लढ्याला आज मोठं यश मिळालं असून राज्य सरकारने सकल मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या आहेत. यानंतर वाशी येथे मनोज जरांगे यांची विजयी सभा पार पडली. या सभेत जरांगे यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सहभागी झाले. यावेळी जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेऊन त्यांचं उपोषण सोडलं. तसेच आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा देखील करण्यात आली.राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणासंबंधीत जवळपास सर्वच प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत. या दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मृत्यूमुखी पडलेल्या मराठा बांधवांच्या कुटुंबियांसाठी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदतीची घोषणा केली आहे. अशा मराठा बांधवांच्या कुटुंबियांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिला आहे.

राज्य सरकारने मान्य केलेल्या प्रमुख मागण्याची माहिती देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कुणबी प्रमाणपत्र देण्याचा, संदीप शिंदे समितीला मुदतवाढ, कुणबी प्रमाणपत्र तात्काळ देण्यासाठी शिबीरे, तसेच वंशावळ जुळवणीसाठी समिती नेमली. यासोबत क्युरेटीव्ह पेटीशन मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाला कुणबी नोंदी सोडून इतर लोकांना आरक्षण द्यावं ही मागणी, आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसीच्या सवलती या मागण्या मान्य केल्या आहेत.पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आपण वाऱ्यावर सोडणार नाहीत. त्यांना देखील नोकऱ्या देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. त्यांना मोबदला, नुकसानभरपाई म्हणून ८० लोकांना चार लाख याप्रमाणे आर्थिक मदत दिली. नोकऱ्या देखील देणार आहोत. सरकार सर्वसामान्याचं सरकार आहे, त्यामुळे गुन्हे मागे घेण्याचे तसेच इतर निर्णयांची पूर्ण अमलबजावणी होईल असा शब्द मी यावेळी देतो असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं.