• Wed. Apr 30th, 2025

अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं मग बघा कामात कसा बदल जाणवतो, दादांसमोरच वळसे पाटलांची फटकेबाजी

Byjantaadmin

Jan 26, 2024

पुणे : मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी आमची भावना आहे. तसे सरकारचे प्रयत्न देखील सुरू आहेत. आपण शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार शेवटपर्यंत जोपासणार आहोत. अजितदादांनी राज्याचे नेतृत्व करावं, मग बघा कामातील बदल तुम्हाला सर्वांना कसा जाणवतो, असे मत राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे आमदार अतुल बेनके यांच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना दिलीप वळसे पाटील बोलत होते. या कार्यक्रमाला स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

यावेळी वळसे पाटील म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी सरकारची अपेक्षा आहे, तसे सरकारचे प्रयत्न देखील सुरू आहेत. राजकारणात काही निर्णय घ्यावे लागतात. तसा निर्णय अजितदादांनी घेतला. आपण शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार शेवटपर्यंत जोपासणार आहोत. अजितदादांनी राज्याचे नेतृत्व करावं, मग बघा कामातील बदल तुम्हाला सर्वांना कसा जाणवतो, असं वळसे पाटील म्हणाले.

अतुल बेनके यांनी स्पष्ट केली भूमिका

राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी आपली भूमिका तटस्थ ठेवली होती. त्यावर अनेक टीका देखील करण्यात येत होती. मात्र आज अखेर अतुल बेनके यांनी शेतकरी मेळाव्यात अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असल्याचे बालले जात आहे. जुन्नरकरांच्या विकासासाठी आपण येणाऱ्या काळात नेहमी तत्पर असणार असल्याचे बेनके यांनी यावेळी सांगितले आहे. जुन्नर तालुक्यातील अनेक महत्वाचे प्रश्न अजितदादांनी मार्गी लावले असल्याचे अतुल बेनके यांनी सांगितले. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जुन्नर तालुक्यातील सहकार क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed