अहमदनगर : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेली आंतरवाली ते मुंबई पदयात्रा सोमवारी नगर जिल्ह्यात आहे. रात्रीचा मुक्काम संपवून यात्रा पुढील प्रवासाला रवाना झाली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समोर येऊन चर्चा करण्याचे आव्हान दिले. ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्हाला संयम ठेवण्यास सांगण्यापेक्षा आरक्षण देण्यास उशीर का झाला म्हणून, सरकारला धारेवर धरले पाहिजे. मात्र, ते उलट वागत आहेत. सात महिन्यात ते एकदाही मराठा समाजाकडे आले नाहीत. त्यामुळे त्यांनी एकदा मराठा समाजासमोर यावे, नेमकी भूमिका मांडावी म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी करू,’ असे आव्हान मनोज जरांगे यांनी अजित पवार यांना दिले.जरांगे यांची पदयात्रा रविवारी रात्री नगरच्या बाराबाभळी येथील मदरशाच्या मैदानावर मुक्कामाला होती. जरांगे यांनीही मदरासामध्ये मुक्काम केला. मुस्लिमांनी त्यांचे स्वागत आणि सहभागी कार्यकर्त्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविल्या. सकाळी पुढील प्रवासाला निघताना प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले, ‘कोणाची अडचण करण्याची आमची अजिबात इच्छा नाही. मात्र सरकार योग्य प्रतिसाद देत नसल्याने ही वेळ आली. आम्हाला मुंबईला जाण्याची हौस नाही. सरकारने योग्य प्रकारे संवाद करावा, धमक्या, दमबाजी नको. लोकशाहीतील कायद्याला धरून आम्ही शांततेच्या मार्गाने उपोषणाची परवानगी मागितली आहे. सत्तेच्या जोरावर कायदा पायदळी तुडविणे सरकारला महागात पडेल, असं मनोज जरांगे म्हणाले.मुस्लिम समाजाने आम्हाला चांगले सहकार्य केले. राज्यातही मुस्लिम बांधव आमच्या मागणीसोबत आहेत. प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान असतो, आम्हालाही आहे. मात्र, एकमेकांचा आदर राखला पाहिजे, हे आम्ही मानतो. येथील मुस्लिमांनीही ते दाखवून दिले. आज हिंदूस्थानच्या नागरिकांसाठी अयोध्येत आनंदाचा सोहळा आहे. या आंदोलनामुळे आम्ही तेथे जाऊ शकलो नाही. आम्ही जमेल तेथे हा सोहळा साजरा करणार आहोत. सकाळी उठल्यावर आणि शेतात काम करतानाही आम्ही रामाचे नाव घेतोच,’ असेही जरांगे म्हणाले.रात्री मुक्काम केल्यानंतर आज पदयत्रा भिंगार, नगर शहर, केडगावहून पुढे मार्गस्थ झाली. सुपे येथे दुपारची विश्रांती घेऊन यात्रा रात्री पुणे जिल्ह्यात रांजणगाव येथे मुक्कामाला जाणार आहे. प्रत्येक ठिकाणी पोहोचण्यास यात्रेला सुमारे पाच तास उशीर होत आहे. कार्यकर्त्यांची गर्दी, वाहने, रस्त्यात होणारे स्वागत, भेटीगाठी यामुळे पायी आणि वाहनांद्वारे केला जाणारा प्रवासही मंद गतीने सुरू आहे. नगरहून पुढे जाताना जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचीही यात भर पडल्याने गर्दी वाढली आहे.
