निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयात दि. २० जानेवारी रोजी महिला सक्षमीकरण कक्षाच्या वतीने “महिला सक्षमीकरण आणि कायदेविषयक जाणीव जागृती” या विषयावर लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विधी अधिकारी ॲड. वर्षा खोडसे – भिसे यांचे अत्यंत उत्कृष्ट असे मार्गदर्शन झाले. यावेळी विद्यार्थिनींनी प्रत्येक क्षेत्रातील यशस्वी अशा पहिल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान म्हणून स्वतः एकेका कर्तृत्ववान महिलेचे पात्र वठवून त्यांच्या जीवन व कार्याचा परिचय त्यांच्याच शब्दात सादर केला. या वेळी विचारपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम.एन. कोलपुके उपस्थित होते. शिवाय, ग्रंथपाल मीनाक्षी बोंडगे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ डी. एस. चौधरी, महिला सक्षमीकरण कक्षाच्या समन्वयक प्रा. मनीषा घोगरे यांची उपस्थिती होती. ॲड. वर्षा खोडसे-भिसे यांनी उपस्थित सर्वांना महिला सुरक्षाविषयक कायदे समजावून सांगत महिलांनी अन्यायाचा धैर्याने आणि युक्तीने प्रतिकार करायला हवा असे प्रतिपादन केले. त्यांनी महिलांच्या बाबतीत आर्थिक स्वावलंबन आणि शिक्षण या दोन अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत याकडे लक्ष वेधले. महिलांनी स्वतःला अधिकाधिक घडवून स्वावलंबी व्हायला पाहिजे तसेच त्यांनी आपल्या हक्क आणि अधिकाराबाबत जागरूक राहिले पाहिजे असे मत व्यक्त केले. महिलांना त्यांच्या हक्कासाठी लढताना शासन स्तरावरून मदत होत असते याची माहिती देऊन त्यांनी महिलांवरील अत्याचार प्रतिबंधक कायदे समजून घेऊन योग्य त्या ठिकाणी दाद मागण्याचा सल्ला दिला. शिवाय, कायदेविषयक मदत घेताना महिलांनी आधी आपल्यावरील अन्यायाला वेळोवेळी दाद मागणे आवश्यक असल्याचे नमूद केले. त्यांनी सर्व विद्यार्थिनींना यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एन. कोलपुके यांनी मुलींनी स्वतःला कौशल्यसंपन्न बनवले पाहिजे आणि नव्या काळाची आव्हाने पेलण्यास स्वतःला सक्षम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. तसेच त्यांनी ज्या विद्यार्थिनींनी कर्तृत्ववान महिलांची भूमिका केली त्यांचे अभिनंदन करून त्यांनी आपल्या आयुष्यात त्या कर्तृत्ववान महिलांचा आदर्श घेऊन वाटचाल करण्याचा संदेश दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मनीषा घोगरे यांनी केले.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. शिल्पा कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. अनुराधा महाजन यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोनम पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. हंसराज भोसले, प्रा. पृथ्वी फावडे, प्रा. पूनम सातपुते, प्रा. शुभांगी शहापुरे, प्रा. शुभांगी पवार, प्रा. स्नेहा बोळे, प्रा . रेश्मा चौधरी, प्रा. मनीषा वारद, दत्ता माने, नामदेव गाडीवान, सुनील वाकळे, सिद्धेश्वर कुंभार यांनी परिश्रम केले.
