• Sat. May 3rd, 2025

एलआयसीने केला मोठा उलटफेर, एसबीआयला मागे टाकून बनली ‘किंग’

Byjantaadmin

Jan 17, 2024

मुंबई : दोन वर्षांपूर्वी बाजारात सूचिबद्ध झाल्यापासून देशातील सर्वात मोठी विमा कंपनी, एलआयसीने (लाइफ इन्श्युरन्स कॉर्पोरेशन) गुंतवणूकदारांची चिंता वाढवली होती. परंतु अलीकडेच कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने तेजी पाहायला मिळत असून अलीकडील तेजीच्या बळावर एलआयसीने नवीन इतिहास रचला आहे. भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड होत असताना बुधवारी एलआयसीच्या स्टॉकने तेजीत वाटचाल सुरू ठेवली. सुरुवातीच्या व्यवहारात स्टॉकने सुमारे २% उसळीसह ९१९.४५ रुपयांवर उडी घेतली, जो स्टॉकचा नवीन उच्चांक आहे.

एलआयसी शेअरचा नवा पराक्रम
एलआयसीच्या शेअरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तेजी पाहायला मिळत असून आज एकीकडे शेअर बाजार कोसळताना आणि सर्वत्र विक्री सुरू होती, तेव्हाही एलआयसीच्या शेअरने मोठी उडी घेतली. पडत्या बाजारात एलआयसीचे शेअर्स ग्रीन झोनमध्ये ट्रेंड करत आहेत आणि या वाढीसह विमा कंपनीला मोठे यश मिळाले आहे. एलआयसीने स्टेट बँक ऑफ इंडियाला मागे टाकून शेअर बाजारातील सर्वात मोठी सरकारी कंपनी होण्याचा मान मिळविला आहे.

शेअरची किंमत नव्या उच्चांकावर
बुधवारच्या सत्रात एलआयसी शेअर्सनी ३ टक्केपेक्षा जास्त वाढून ९१९.४५ रुपयांवर नवीन ५२आठवड्यांच्या उच्चांकावर उसळी घेतली आणि यासह कंपनींचे बाजार मूल्य ५.७५ लाख कोटींवर पोहोचले. त्याच वेळी, सकाळच्या सत्रात एसबीआयचे मार्केट कॅप सुमारे ५.६५ लाख कोटी रुपये होते. अशा परिस्थितीत, LIC आता देशातील सर्वात मौल्यवान PSU (सर्वात मोठी सरकारी कंपनी) बनली आहे. विदेश म्हणजे नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून एलआयसीच्या शेअरची किंमत ५०% हून अधिक वाढली आहे.गेल्या महिन्यात वित्त मंत्रालयाने PSU विमा कंपन्यांना २०३२ पर्यंत २५% किमान सार्वजनिक शेअरहोल्डिंग (एमपीएस) नियमांचे पालन करण्यापासून सूट दिली होती. तेव्हापासून एलआयसी स्टॉक सतत आगेकूच करत आहे कारण डिस्काउंटमुळे सरकारी ऑफर फॉर सेलची (OFS) शक्यता कमी होते.

सेबीचा नियम काय
भांडवली बाजार नियामक सेबीच्या नियमांनुसार सर्व सूचीबद्ध कंपन्यांना २५% सार्वजनिक फ्लोट राखण्याचे बंधनकारक आहे, परंतु नवीन सूचीबद्ध कंपन्यांना अट पूर्ण करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी दिला जातो. मे २०२२ मध्ये सरकारने एलआयसी IPO मधील ३.५% हिस्सा विकला होता ज्याची किंमत सुमारे २१,००० कोटी रुपये होती (ऑफर फॉर सेल) जो भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *