• Fri. May 2nd, 2025

शिंदे-नार्वेकर भेटीवरुन शरद पवारांना शंका, निर्णय देणाऱ्या व्यक्तीने ज्याची केस त्याच्याच घरी जाणं संशयास्पद

Byjantaadmin

Jan 9, 2024

मुंबई: शिवसेनेतील आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांसमोर आलेल्या सुनावणीचा निकाल येण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. या निकालापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. ही भेट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ही भेट नैतिकदृष्ट्या कितपत योग्य आहे, याबाबत शंका उपस्थित केली आहे. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.यावेळी शरद पवार यांनी म्हटले की, ही साधी आणि सरळ गोष्ट आहे की, ज्यांच्यापुढे केस आहे आणि ज्यांची केस आहे त्यांनी अशाप्रकारे भेटणे योग्य नाही. ज्यांची केस आहे त्यांनी निर्णय घेणाऱ्या व्यक्तीसमोर आपली बाजू मांडणे चूक नाही. पम ज्यांच्यासमोर बाजू मांडली जात आहे, ज्यांचा निर्णय अभिप्रेत आहे, ते गृहस्थ ज्यांची केस असेल त्यांच्याकडे जात असतील तर संशयाला जागा निर्माण होते. तसे केले नसते तर विधानसभा अध्यक्षांची प्रतिमा चांगली राहिली असती, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बुधवारी दुपारी चार वाजता विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात शिवसेनेतील आमदारांच्या अपात्रतेबाबत अंतिम निकाल देणार आहेत. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाचे आमदार अपात्र ठरणार किंवा विधानसभाध्यक्ष शिंदे गटाच्या बाजूने निकाल देणार, याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. मात्र, शिंदे-नार्वेकर भेटीनंतर ठाकरे गटाचे नेते आणि शरद पवार यांनी संपूर्ण न्यायप्रक्रियेबाबतच शंका उपस्थित केली आहे. या आक्षेपाला भाजप आणि शिंदे गटाकडून कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहावे लागेल.

Sharad Pawar press conference

 

दिल्लीतलं सरकार पडत नाही तोपर्यंत विरोधी पक्षातील नेत्यांवर धाडी पडत राहणारच: पवार

ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीने मंगळवारी सकाळी छापा टाकला होता. काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोवरही ईडीची धाड पडली होती. याविषयी शरद पवार यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, सध्याच्या घडीला विरोधी पक्षातील नेत्यांवरच धाडी पडताना दिसत आहेत. सत्ताधारी नेत्यांबाबत ही गोष्ट घडत नाही. जोपर्यंत दिल्लीत त्यांचे सरकार तोपर्यंत विरोधी पक्षातील नेत्यांवर धाडी पडतच राहणार. आज रवींद्र वायकरांबाबत ही गोष्ट घडली. रोहित पवार यांच्याबाबतही हाच प्रकार घडला. या गोष्टी होत असतात. आज देशात त्यांची सत्ता आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *