राष्ट्रवादी आमदार अपत्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर) यांच्या कोर्टात सुनावणी सुरु होणार आहे. राष्ट्रवादी आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणीचे वेळापत्रक तयार करण्यात आलेय. 20 आणि 21 जानेवारीला अजित पवार गटाची उलटतपासणी होणार आहे. तर 22 आणि 23 जानेवारीला शरद पवार गटाची उलटतपासणी होणार आहे. 16 दिवस साक्ष ते उलटतपासणी झाल्यानंतर अंतिम निकाल देण्यात येणार आहे.
असे असेल कामकाजाचे वेळापत्रक –
6 जानेवारी – राष्ट्रवादीचे दोन्ही गटांमध्ये याचिका आणि त्यावरील उत्तराची कागदपत्रे एकमेकांना सोपविली जातील.
8 जानेवारी – याचिकेसाठी अधिकची, अतिरिक्त माहिती जोडण्यासाठी वेळ.
9 जानेवारी – फाईल्स किंवा अधिकची, अतिरिक्त कागदपत्रे पटलावर आणणे. मात्र, ९ तारखेनंतर ऎनवेळी कोणतीही नवी कागदपत्रे जोडता येणार नाही. अशा मागणीचा विचार केला जाणार नसल्याचे स्पष्टपणे बजावण्यात आले आहे.
11 जानेवारी – याचिकेशी संबंधित कागदपत्रांची पाहणी आणि पडताळणी. पहिल्या दिवशी शरद पवार गट अजित पवार गटाकडून सादर झालेली कागदपत्रे तपासली जातील
12 जानेवारी – याचिकेशी संबंधित कागदपत्रांची पाहणी आणि पडताळणीचा दुसरा दिवस. अजित पवार गटाकडून शरद पवार गटाने सादर केलेल्या कागदपत्रांची पाहणी केली जाईल.
14 जानेवारी – सुनावणीच्या कामकाजात कागदपत्रांचा समावेश करण्यासाठी किंवा एखादे वगळण्यासाठी अर्ज दाखल करण्याचा दिवस.
16 जानेवारी – विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांसमोर पहिली प्रत्यक्ष सुनावणी. सुनावणीचे विषय नक्की केले जातील.
18 जानेवारी – प्रतिज्ञापत्र सादर करणे.
20 जानेवारी – अजित पवार गटाच्या साक्षीदारांच्या उलटतपासणी
20 व 21 जानेवारी अजित पवार गट उलट तपासणी
22 व 23 जानेवारी शरद पवार गट उलट तपासणी
23 जानेवारी – शरद पवार गटाच्या साक्षीदारांच्या उलटतपासणी
25 आणि 27 जानेवारी – राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे अंतिम युक्तीवाद.
हिवाळी अधिवेशनादरम्यान नोटिसा
हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेकडून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. आठ दिवसांमध्ये उत्तर सादर करण्याचे आदेश या नोटिसांमधून देण्यात आले होते. त्यानंतर 5 डिसेंबरला आमदारांना विधीमंडळाकडून आठ दिवसांत उत्तर सादर करण्यासाठी नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. यावर आता अजित पवार गटाने उत्तरासाठी एक महिना अधिकचा कालावधी मागितला. शरद पवार गटाने मात्र आमदार अपात्रतेच्या नोटिसीला उत्तर सादर केले होते.
निवडणूक आयोगात सुनावणी सुरू
राष्ट्रवादी कोणाची, पक्षावर दावा कुणाचा यावर निवडणूक आयोगात सुनावणी सुरु आहे. अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगात भूमिका मांडण्यात आली आहे. अजित पवार आणि शरद पवार गटाचा एकमेकांवर बनावट शपथपत्रं सादर केल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रवादी पक्षाची स्थापना शरद पवारांनी केली, मग त्यांच्याशिवाय पक्ष कसा काय असू शकतो असा सवाल शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी उपस्थित केला आहे. तर सुप्रिया सुळे यांच्या कार्याध्यक्षपदाची नियुक्ती चुकीची असल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाकडून आतापर्यंत करण्यात आला आहे.