• Tue. Apr 29th, 2025

अयोध्येतील राममंदिराच्या उद्घाटनानिमित्त २२ जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी ?

Byjantaadmin

Jan 2, 2024

मुंबई: अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनादिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी भाजपने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवशी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. त्यातच राम मंदिर हा सर्वांचाच जिव्हाळ्याचा विषय असल्याने या सोहळ्यात सर्व नागरिकांना सहभागी होता यावे, यासाठी ही सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

‘२२ जानेवारी हा ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. प्रभू राम मंदिर उभारणीसाठी सुमारे ५००-५५० वर्षांचा संघर्ष करण्यात आला आहे. शेकडो रामभक्तांनी यामध्ये आपल्या प्राणाची आहुती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हे मंदिर उभारणीचे काम झाले आहे. प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान होणार, या दिवसाची तमाम रामभक्तांना प्रतीक्षा आहे. त्या दिवशी आपापल्या भागांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना उपस्थित राहता यावे, सोहळ्यात सहभागी होता यावे, यासाठी शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, खासगी आस्थापनांना अशा स्वरूपाचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणीही भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

‘जयंतीच्या पूर्वसंध्येला राममंदिर ही ‘बाळासाहेबांना श्रद्धांजली’

कोट्यवधी रामभक्तांसह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे अयोध्येत राम मंदिर व्हावे, हे स्वप्न होते. बाळासाहेबांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला अयोध्येत २२ जानेवारी रोजी राममंदिराचे लोकार्पण होत आहे, ही बाळासाहेबांना मोठी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी मध्यरात्री ठाण्यात रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमात केली.
शिबिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: रक्तदान केले. ‘परदेशी गुंतवणुकीत राज्याने कर्नाटक, गुजरातला मागे टाकून पुन्हा पहिला क्रमांक मिळवला आहे. अनेक उद्योजक आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी आजही महाराष्ट्राला पहिली पसंती देत आहेत’, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, ठाणे जिल्हा महिला आघाडी संघटक मीनाक्षी शिंदे, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे, शाखाप्रमुख निखिल बुडजडे, उपविभागप्रमुख स्वानंद पवार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed