• Mon. Apr 28th, 2025

नवीन वर्षाचे स्वागत ३०० फुल झाडांचे रोपण करून ग्रीन लातूर वृक्ष टीमचा उपक्रम 

Byjantaadmin

Jan 1, 2024
नवीन वर्षाचे स्वागत ३०० फुल झाडांचे रोपण करून ग्रीन लातूर वृक्ष टीमचा उपक्रम
आज दिनांक १ जानेवारी २०२४ ग्रीन लातूर वृक्ष टीमने बाभळगाव चौक ते स्वामी विवेकानंद चौक रस्ता दुभाजकात ३०० फुल झाडे लावून नवीन वर्षाचे आगळे वेगळे स्वागत केले. सर्वसाधारण ३१ डिसेंबर ची तयारी म्हणजे मित्रांना जमवणे, खूप मोठ्या आवाजात गाणे लावणे, फटाक्यांचे जोर जोरात आवाज करणे, मद्यप्राशन करणे आणि धांगडधिंगा घालणे अशीच काहीशी संकल्पना होऊन बसलेली आहे, हे सर्वच जण करतात असे नाही परंतु हा सर्व प्रकार सर्रास पहावयास मिळतो.
परंतु ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सदस्यांची ३१ डिसेंबर २०२३ रोजी नवीन वर्षाचे स्वागत करिता वरील संकल्पनेला फाटा देऊन यापेक्षा काहीतरी वेगळेच करण्याचे नियोजन केले.  नवीन वर्षाच्या स्वागताकरिता जास्तीत जास्त फुल झाडांचे रोपण करायचे, त्याकरिता जागा शोधणे, त्या जागेवर खड्डे करणे, फुलझाडे टेम्पो भरणे, निश्चित ठिकाणी सर्व झाडे पोचवणे आणि सर्व झाडांचे रोपण करून त्यांना टँकरद्वारे भरपूर पाणी देणे, असे कार्य किंवा नवीन वर्षाचे स्वागत आपणास कुठेही पहावयास मिळणार नाही…..
ग्रीन लातूर वृक्ष टीम ही ७० सदस्यांची असून सर्व म्हणजेच वय वर्ष ४ ते ७८ वर्ष वयाची तरुण सदस्य या टीम मध्ये कार्य करतात.
या टीमला कोणी अध्यक्ष नाही ना कोणी पदाधिकारी, टीम चालते ती एक विचाराने, ही टीम स्वच्छ लातूर सुदंर लातूर हरित लातूर हा निःस्वार्थ उद्देश घेऊन कार्यरत आहे. या टीमने आज दिनांक ०१-०१-२०२४ रोजी अखेर १ लाख ३८ हजार लहानमोठी झाडे रोपण करूनच थांबलेले नाहीत, तर प्रत्येक झाड जगवण्या साठी झाडांचे संगोपन करणे, झाडांना पाणी देणे यासाठी अहोरात्र कष्ट करताना संपूर्ण लातूरकर पाहतच आहेत. आज ग्रीन लातूर लक्ष टीमच्या अविरत कार्याचा १६७६ वा दिवस असून दररोज सकाळी ६.०० ते ९.०० आणि कधी कधी १०.०० वाजेपर्यंत म्हणजेच दररोज ३ ते ४ तास या शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकण्या करीता प्रयत्न करीत आहे आणि या प्रयत्नास खऱ्या अर्थाने यश प्राप्त होत आहे म्हणले तर चुकीचे होणार नाही.
 कारण आपल लातूर हिरवे दिसतय… उद्देश हरित लातूर.
आपले लातूर स्वच्छ दिसावे याकरिता शहरातील रस्ता दुभाजक, स्मशानभूमी तसेच शहरात ठिकठिकाणी टाकलेला कचरा गोळा करण्याचे काम प्रशासनास लाजवेल किंवा कसलीही लाज न बाळगता वेळोवेळी संपूर्ण शहर साफ करण्याचे काम ही ग्रीन लातूर वृक्ष टीम करत आहे. त्याचबरोबर पेटवलेला कचरा विजवणे, त्याचे दुष्परिणाम लोकांना समजून सांगुन जनजागृती करणे, ही सर्व कामे या टीम मधील प्रत्येक सदस्य निष्ठेने करतो आहे. आणि खऱ्या अर्थाने या टीमला या कार्यात यश येत आहे असे म्हटले तर चुकीच होणार नाही कारण आपल्याला लातूर स्वच्छ दिसतंय….. उद्देश स्वच्छ लातूर
आपले लातूर सुंदर दिसावे याकरिता छत्रपती शिवाजी महाराज चौक, भुयारी मार्गात वारली पेंटिंग करून व संपूर्ण लातूरकरांचे लक्ष वेधण्यास या टीमला फार मोठे यश प्राप्त झाले आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील उड्डाणपुलाची पिलर वर लावण्यात आलेल्या जाहिराती पोस्टर्स हे काढून सदरचे पिल्लर्स स्वच्छ पाण्याने धुण्याचे काम या ग्रीन लातूर वृक्ष टीम मार्फत केले जाते. लातूर शहरातील मुख्य बस स्थानक येथे सुंदर झाडाची पेंटिंग करून निश्चितच लातूरमध्ये आलेल्या प्रत्येक प्रवाशास तिथे सेल्फी घेण्याचा मोह व्हावा एवढी चांगली पेंटिंग करण्यात आलेली आहे आणि खऱ्या अर्थाने ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सदस्यांनी केलेल्या कार्यास यश येत आहे असे म्हटले तर चुकीचे होणार नाही कारण आपल लातूर सुंदर दिसतय….. उद्देश सुंदर लातूर.
यावरच या टीमचे कार्य येथेच न थांबता शहरातील महापुरुषांचे स्मारकांची स्वच्छता ही ग्रीन लातूर वृक्ष टीम वेळोवेळी करते, मग स्मारक परिसराचे फुलझाडे लावून सुशोभीकरण करणे, त्यांना पाणी देणे, आवश्यकतेप्रमाणे साफसफाई करण्याचे काम हे नित्याचेच आहे. तसेच प्रत्येक सण उत्सव उदाहरणात गणपती, राखी पौर्णिमा, दिवाळी इत्यादी ही टीम झाडांसोबतच साजरा करतेवेळी संपूर्ण लातूरकर मागील साडे चार वर्षापासून पाहतच आहेत.
आजचा असा हा आगळावेगळा नववर्षाचा आनंद सोहळा साजरा करणे करिता ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉ. पवन लड्डा, पद्माकर बागल, ऍड. वैशाली लोंढे यादव, राहुल माने, प्रवीण भराटे, दयाराम सुडे, सिताराम कनजे, नागसेन कांबळे, गणेश सुरवसे, पूजा पाटील, लक्ष्मी बटनपुरकर मॅडम, आकाश सावंत, आदित्य स्वामी, अरविंद फड, अभिषेक घाडगे, अमोल बिराजदार, रवी तोंडारे हे उपस्थित होते तसेच या सर्वांनी नि:स्वार्थपणे श्रमदान केले.
या अनोख्या नववर्षाच्या उपक्रमाचे उपस्थित नागरिकांनी खूप कौतुक केले.
ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed