• Wed. Apr 30th, 2025

सध्या सगळे संधीसाधू, कोण कुठे जाईल सांगता येत नाही, राजकीय स्थितीवर गडकरींची टिप्पणी

Byjantaadmin

Dec 22, 2023

मुंबई: ‘सध्या राजकारणात तत्वनिष्ठता राहिलेली नाही. हल्ली कुठली व्यक्ती, कधी, कुठल्या पक्षात जाईल याची काही शाश्वतीच नाही. एखाद्या राजकीय विचाराला घट्ट धरून आयुष्य व्यतित करणे हे दुर्मीळ होत चालले आहे. एखाद्याचे विचार पटत नसतील तरीही त्याचा आदर करणे, हा स्वभाव राहिला नाही’, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी केली. ‘हल्ली विरोधी पक्षाशी संवाद होत नाही, त्यांचेही वर्तन साजेसे राहिलेले नाही. हे असेच सुरू राहिले तर लोकशाही व्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास उडेल’, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
लोकमान्य सेवा संघ, पार्ले आणि श्री. वा. फाटक ग्रंथसंग्रहालयतर्फे ‘लोकमान्य गप्पा’ कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी विलेपार्ले येथील सावरकर पटांगणात करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मुलाखत घेतली. राजकारण, देशातील पायाभूत सुविधांचा विकास, भविष्यातील दळणवळणातील सुविधा यांविषयी गडकरी यांनी आपली मते मांडली. राजकारणाच्या सद्यस्थितीबाबत बोलताना गडकरी म्हणाले की, ‘सध्या कोण उजव्या विचारसरणीचे, कोण डाव्या विचारसरणीचे हे कळतच नाही इतक्या प्रमाणात पक्ष बदलले जातात. सध्या सर्वच क्षेत्रांत गुणात्मकता कमी झाली आहे. राजकारणही त्याला अपवाद राहिलेले नाही’. ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते ए. बी. बर्धन यांच्या राजकीय तत्वनिष्ठेचे उदाहरण गडकरी यांनी यावेळी दिले; ‘आता राजकारणात अशी तत्वनिष्ठता राहिली नाही. सध्या सगळे संधीसाधू आहेत’, असे तिखट शेरे त्यांनी नोंदवले.

सध्या लोकसभेत सुरू असलेल्या गोंधळाबाबत आणि उपराष्ट्रपती धनखड यांच्या नकलेबाबत मत व्यक्त करताना गडकरी यांनी विरोधी पक्षाबाबत नाराजी व्यक्त केली. ‘विरोधी पक्षांनी स्वतःच्या मर्यादा समजून घ्यायला हव्यात. आपण कसे वागतो याचे आत्मपरीक्षण त्यांनी करायला हवे. सध्या सुरू असलेल्या गोंधळाला सामान्य जनता कंटाळली असून, यामुळे जनतेचा लोकशाही व्यवस्थेवरचा विश्वास उडेल’, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

मुंबई-महाराष्ट्राबाबत विचारले असता गडकरी मिष्कीलपणे म्हणाले, ‘मी आधी दिल्लीत जायला इच्छुक नव्हतो. पण आता माझे प्रारब्ध दिल्लीतच आहे. त्याच्याभोवती माझे आयुष्य आहे’. ‘सध्या महाराष्ट्रात काय सुरू आहे हे मला माहीत नाही आणि माहीत करून घेण्याची इच्छाही नाही’, असे उद्गार त्यांनी काढले.

जात-धर्म, पंथ विसरून मतदान व्हावे’

‘मुंबई-गोवा महामार्ग ६ महिन्यांत’

‘मुंबई-गोवा महामार्ग रखडला याचा सल नेहमीच मला लागून राहिला आहे. सन २००९ मध्ये याचे काम दोन कंपन्यांना देण्यात आले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम घेतले आणि त्यानंतर विलंब होतच गेला. जमीन अधिग्रहणाची मोठी समस्या या कामात आड आली. आता बऱ्यापैकी समस्या सुटल्या असून पुढील सहा महिन्यात हा महामार्ग पूर्ण व्हायला हवा’, असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed