पुणे: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना गुरुवारी पुण्यात एका अनपेक्षित प्रसंगाला सामोरे जावे लागले. पुण्यात चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद सुरु असताना त्याठिकाणी एक अनोळखी तरुण आला. पत्रकारांप्रमाणे त्यानेही चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. यापूर्वीच्या ‘कटू’ अनुभवांमुळे चंद्रकांत पाटील हे अलीकडे सार्वजनिक ठिकाणी अनोळखी व्यक्तींपासून सावधानता बाळगताना दिसतात. त्यामुळेच आज चंद्रकांत पाटील यांच्या पत्रकार परिषदेत अनोळखी तरुण शिरल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.या तरुणाने चंद्रकांत पाटील यांना थेट प्रश्न विचारला. चंद्रकांत पाटील यांना संशय आल्याने त्यांनी संबंधित तरुणाला, ‘तुम्ही पत्रकार आहात का?’, असा प्रश्न विचारला. त्यावर तरुणाने नाही, असे उत्तर दिले. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी, ‘पत्रकार नसाल तर बाजूला व्हा’, असे तरुणाला म्हटले. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक महोत्सवाला चंद्रकांत पाटील यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी हा प्रकार घडला. या तरुणाचे नाव कुणाल असून त्याने वनविभागाशी संबंधित परीक्षेविषयी प्रश्न विचारला होता. अनेकदा परीक्षा देऊनही या तरुणाला नोकरी मिळू शकलेली नाही. त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री या नात्याने चंद्रकांत पाटील यांना तरुणाने प्रश्न विचारला होता. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी तरुणाच्या प्रश्नाला उत्तर देणे स्पष्टपणे नाकारले. चंद्रकांत पाटील यांनी या तरुणाला बाजुला घेण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या. त्यानंतर पोलिसांनी या तरुणाची चौकशी केली आणि नंतर त्याला सोडून दिले.
भाजप आमदारांच्या रिपोर्ट कार्डबाबत चंद्रकांत पाटलांचं भाष्य
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून आमदारांचे रिपोर्ट कार्ड तयार केले जात आहे. याबाबत विचारले असता चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, भाजपामध्ये ग्राम पंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, महापौर ,आमदार, खासदार या सगळ्या लोकांच्या कामगिरीवर पक्षाकडून लक्ष ठेवले जाते. फक्त पुण्यातून नाही तर सगळ्या लोकांचे परफॉर्मन्स कार्ड पार्टीने मागितले आहे. कारण भाजपचा हा आग्रह आहे की, निवडणुकीपुरती लोकांची कामे न होता सतत आमच्या लोकांनी समाधान देणारी कामे करावीत, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.