• Wed. Aug 13th, 2025

मुंबई-पुणे, नाशकातच नाही तर सोलापूरचं एमडी ड्रग्ज संपूर्ण देशात पोहोचतंय, तपासात धक्कादायक माहिती समोर

Byjantaadmin

Dec 19, 2023

सामनगाव येथील एमडी ड्रग्ज प्रकरणातील तस्करांनी सोलापुरात सुरू केलेल्या नशेच्या कारखान्यातून फक्त नाशिक, मुंबई, पुणे या जिल्ह्यांतच नव्हे, तर देशभरात एमडी पोहोचत असल्याची धक्कादायक माहिती ‘मोक्का’अंतर्गत तपासात उघड झाली आहे.उमेश वाघ या संशयिताने पोलिसांना यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यानुसार, संशयित सनी पगारे आणि अर्जुन पिवाल गँगसह इतरांना एमडी कारखाने सुरू करण्यास मदत करणाऱ्या संशयित फय्याज (पूर्ण नाव नाही) याचा माग पोलिस काढत आहेत. सामनगाव एमडी प्रकरणातील पंधरा संशयितांवर तत्कालीन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ‘मोक्का’ लावला आहे. या प्रकरणातील संशयित सनी पगारे गँगने नाशिकमध्ये एमडी तस्करी सुरू केली. अर्जुन पिवालसह इतर साथीदारांमार्फत ही तस्करी राज्यभरात सुरू होती. त्यानंतर केरळच्या संशयितामार्फत रसायन खरेदी करून सनी याने सोलापुरात ‘एमडी’चा कारखाना सुरू केला. एकाच वेळी शंभर किलोंपेक्षा अधिक एमडी तयार करण्याची त्याची क्षमता होती. मात्र, मोठ्या प्रमाणात एमडी बाजारात येण्यापूर्वी नाशिक अमली पदार्थविरोधी पथकाने सोलापुरात धाड टाकली. या प्रकरणातील संशयित उमेश सुरेश वाघ (रा. विरार) याने कारखाने सुरू करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार तस्करांनी हा ‘उद्योग’ केला. सनीच्या सोलापुरातील एमडी कारखान्यातील माल स्पीकर्समध्ये भरून तस्करी करण्याचा सल्लादेखील वाघ यानेच दिला होता. त्याने नाशिकसह राज्यातील इतर ठिकाणच्या एमडी कारखान्यांतही ‘सल्लागारा’ची भूमिका बजावल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान, या सर्वांचा मास्टरमाइंड आणि देशभरात एमडी विक्री करणारा मुख्य संशयित फय्याज असल्याची माहिती वाघच्या चौकशीत समोर आली आहे. नाशिकरोड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त या प्रकरणी सखोल चौकशी करीत आहेत. त्यानुसार, फय्याजच्या मागावर काही पथके रवाना झाली आहेत.

Drug.

 

ललितसह चौघे कारागृहात

शिंदे गाव एमडी प्रकरणातील संशयित ललित पानपाटील याच्यासह रोहित चौधरी, हरीश पंत, जिशान शेख या संशयितांना अमली पदार्थविरोधी पथकाने सोमवारी (दि. १८) जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने चौघांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्यांची रवानगी पुन्हा मुंबईतील आर्थररोड कारागृहात करण्यात आली. दहा दिवसांच्या पोलिस कोठडीत ललितने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, महिन्यातील वीस दिवस कारखाना बंद असायचा. दोन हस्तकांमार्फत मुंबईत माल जायचा. त्या दोघांना पोलिस लवकरच ताब्यात घेणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *